वृत्तसंस्था/नारायणपूर
येथे सुरू झालेल्या स्वामी विवेकानंद पुरुषांच्या यू-20 राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये मिझोरामने विजयी सुरुवात करताना महाराष्ट्राचा पराभव केला तर त्रिपुराने गट ड मध्ये अग्रस्थान मिळविले आहे. त्रिपुराने हिमाचाल प्रदेशचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. मिझोरामने महाराष्ट्रावर 4-0 अशी एकतर्फी मात केली. गट ड मधील पहिला सामना खेळताना मिझोरामने सहज विजय मिळविला. लाल्हरुऐतलुआंगाने 14 व्या मिनिटाला विजयी संघाला आघाडी मिळवून दिली. लालडॉनझुआलाने काही मिनिटांनंतर त्यात आणखी एका गोलाची भर घातली. एफ. मलासॉमलुआंगाने फ्री किकवर 30 यार्डावरून फटका मारत 60 व्या मिनिटाला मिझोरामचा तिसरा गोल केला. एन. स्टीफने उत्तरार्धातील इंज्युरी टाईममध्ये आणखी एक गोल नोंदवत मिझोरामचा मोठा विजय निश्चित केला. एकमेव सामना जिंकून 3 गुणांसह त्यांनी गटात दुसरे स्थान घेतले आहे. ड गटात त्रिपुराने दोन सामने जिंकत 6 गुणांसह आघाडी स्थान घेतले आहे. महाराष्ट्र तिसऱ्या तर झारखंड व हिमाचल तळाच्या स्थानी आहेत. मणिपूरची पुढील लढत उत्तर प्रदेशशी तर सिक्कीमची लढत पंजाबशी होणार आहे.









