वृत्तसंस्था/नवी दिल्ली
इंग्लंडचा टी-20 संघाचा दिग्गज खेळाडू जोस बटलर गुजरात टायटन्सच्या शेवटच्या तीन लीग सामन्यांनंतर राष्ट्रीय संघात सहभागी होण्याकरिता रवाना होईल. कारण आयपीएल प्ले-ऑफ आणि 29 मेपासून सुरू होणारी वेस्ट इंडिजविऊद्धची त्याच्या देशाची मर्यादित षटकांची मालिका एकाच वेळी होणार आहेत. टायटन्स 11 सामन्यांमधून 16 गुणांसह लीग टप्प्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळविण्यास सज्ज झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स (18 मे रोजी दूरस्थ), लखनौ सुपर जायंट्स (22 मे) आणि चेन्नई सुपर किंग्स (25 मे) यांच्याविऊद्ध ते उर्वरित तीन सामने खेळतील. एका वृत्तानुसार, प्ले-ऑफ टप्प्यात श्रीलंकेचा डावखुरा कुसल मेंडिस बटलरची जागा घेईल. इतर उल्लेखनीय इंग्लिश खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मोईन अली तसेच जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स), सॅम करन आणि जेमी ओव्हरटन (दोघेही सीएसके) हे परतणार नाहीत. रोवमन पॉवेल आणि मोईन अली वगळता सर्व केकेआर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बेंगळूरला पोहोचले आहेत. पॉवेल आणि अली दोघेही वैद्यकीय कारणांमुळे परत येऊ शकलेले नाहीत. रोवमनवर शस्त्रक्रिया झालेली आहे, तर मोईन आणि त्याचे कुटुंब विषाणूजन्य संसर्गाने ग्रस्त आहे. ‘आम्ही त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो’, असे केकेआरने एका निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला स्टार फलंदाज विराट कोहली गुऊवारी आरसीबी गोटात सामील झाला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन देखील ऑस्ट्रेलियन टिम डेव्हिडसह उर्वरित स्पर्धेसाठी आरसीबीमध्ये पुन्हा सामील होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या जागी करारबद्ध केले असले, तरी बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानच्या आयपीएलमध्ये सहभागाची शाश्वती नाही. कारण या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून अद्याप ना हरकत दाखला मिळालेला नाही आणि तो 17 ते 30 मेदरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तानविऊद्ध पाच टी-20 सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीत आहे. मात्र अजूनही वेळ आहे आणि दिल्लीला आशा आहे की, बीसीसीआयच्या मदतीने समझोता होऊ शकेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन पंजाब किंग्स संघात पुन्हा सामील होईल. परंतु ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या अंतिम तयारीसाठी राष्ट्रीय संघात सामील होण्यापूर्वी तो फक्त उर्वरित लीग सामने खेळेल. दक्षिण आफ्रिकी क्रिकेट मंडळाने आपल्या सर्व खेळाडूंना अंतिम सामन्याच्या मूळ तारखेच्या एका दिवसानंतर म्हणजे 26 मेपर्यंत परत येण्यास सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे आठवडाभर आयपीएल स्थगित करावी लागल्यानंतर अंतिम सामना 3 जून रोजी हलवण्यात आला आहे.









