वृत्तसंस्था/बँकॉक
महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची नीरस कामगिरी पुढे चालू राहिली. येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांच्यासह भारताच्या सर्वच खेळाडूंना पराभव स्वीकारावा लागल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्रीसा आणि गायत्री यांनी दुखापतीनंतर पुनगरामन केले, पण त्यांना जपानच्या रुइ हिराकामी व सायाका होबारा यांच्याकडून दुसऱ्या फेरीत हार पत्करावी लागली. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागल्यानंतर त्रीसा-गायत्री हे शेवटचे भारतीय खेळाडू राहिले होते. पण त्याचा पराभव झाल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. युवा बॅडमिंटनपटू उन्नती हुडा, मालविका बनसोड, आकर्षी कश्यप यांनाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या खेळाडूंकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 17 वर्षीय उन्नतीला जागतिक दुसऱ्या मानांकित व अग्रमानांकित पोर्नपावी चोचुवाँगकडून 14-21, 11-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
39 मिनिटांत ही लढत संपली. जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असणाऱ्या मालविका बनसोडलाही माजी वर्ल्ड चॅम्पियन व स्थानिक फेव्हरिट रत्चानोक इंटेनॉनविरुद्ध झगडावे लागले. इंटेनॉनने हा सामना 21-12, 21-16 असा जिंकत आगेकूच केली. आकर्षी कश्यपलाही थायलंडच्या डावखुऱ्या सुपनिदा केटथाँगने 21-9, 21-14 असे हरविले. एकतर्फी झालेला हा सामना 34 मिनिटांत संपला. पुरुष एकेरीत तरुण मन्नेपल्ली हा एकमेव भारतीय दुसऱ्या फेरीत पोहोचला होता. पण दुसऱ्या फेरीत त्याला दुसऱ्या मानांकित डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनकडून 14-21, 16-21 अशी 42 मिनिटांत हार पत्करावी लागली. यावर्षीय बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमधील स्पर्धेत एकाही भारतीय खेळाडूला अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आलेली नाही. त्यात लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय यांचा समावेश आहे. या तिघांनाही खराब फॉर्म, दुखापती, आजारपण यांची समस्या येत आहेत.









