पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्हा विकास आढावा बैठकीत दिली माहिती
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटल आवारात उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आवश्यक डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकार पातळीवर घेतला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोलताना सांगितली. मंगळवारी सुवर्ण विधानसौध येथे पार पडलेल्या विकास आढावा बैठकीवेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी बोलताना म्हणाले, सरकारने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीवर डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी बहुतांश डॉक्टर अनुत्सुक आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सध्या काही विभाग सुरू करण्यात आले असले तरी त्या ठिकाणी अनेक प्रमुख विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या 30 वर्षांपासून डॉक्टरांची कमतरता असून त्यासाठी आम्ही बिम्स प्रशासनाला पूर्णपणे जबाबदार धरू शकत नाही. डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले.
बैठकीत कॅन्सर हॉस्पिटलच्या जागेबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, बिम्सच्या जुन्या नर्सिंग कॉलेजची इमारत यासाठी पाडता येईल. पण त्यासाठी नवीन नर्सिंग महाविद्यालयासाठी शहरालगत योग्य सोय करावी लागेल. विधान परिषद सदस्य नागराज यादव म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटल आरोग्य विभागाच्या अखत्यारित आणल्यास त्या ठिकाणी आरोग्य सेवा वाढवता येतील. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना देखील यावर देखरेख करता येईल. सध्या बिम्स प्रशासनाकडून सिव्हिलचे व्यवस्थापन पाहिले जाते. बिम्स ही एक वैद्यकीय शिक्षण संस्था असल्याने त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक सुधारित सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे सांगितले. आमदार असिफ सेठ यांनी सिव्हिलमधील तज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे नाराजी व्यक्त केली. यावेळी झालेल्या बैठकांमध्ये बिम्सकडून व्यवस्थित माहिती दिली जात नाही. सिव्हिल हॉस्पिटलची 1300 बेडची क्षमता असली तरी सध्या केवळ त्या ठिकाणी 30 टक्के अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी म्हणाले, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या 64 तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. सरकारने 23 डॉक्टरांच्या नियुक्तीला परवानगी दिली आहे. त्यामुळे रिक्त जागांवर डॉक्टरांची नियुक्ती झाली नाही. सध्या केवळ 10 तज्ञ डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत, असे ते म्हणाले.









