बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित बालाजी काँक्रिट पुरस्कृत बालाजी चषक 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्टस् क्लबने आनंद अकादमीचा 57 धावांनी पराभव करुन बालाजी चषक पटकाविला. सामनावीर व मालिकावीर सचिन तलवार याला गौरविले. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 2 गडी बाद 167 धावा केल्या. त्यात सचिन तलवारने 1 षटकार 11 चौकारासह 89, समर्थ सी.ने 6 चौकारासह 61, समर्थ तलवारने 10 धावा केल्या. आनंदतर्फे कबीरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 25 षटकात 7 गडी बाद 110 धावा केल्या.
त्यात श्लोक चडीचालने 3 चौकारासह 23, जीवा गौडरने 2 चौकारासह 22, स्वराज्यने 2 चौकारासह 18 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सोहमने 14 धावांत 2 तर समर्थ व ध्रुव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे दीपक पवार, सचिन सामजी, विवेक पाटील, प्रमोद पालेकर, मुरगेश , संदीप सिंग, बाळकृष्ण पाटील, डॉ. महांतेश वाली आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब व विजेत्या आनंद अकादमीला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक समर्थ तलवार, उत्प़ृष्ट गोलंदाज निशांत नाईक, उत्कृष्ट फलंदाज सचिन तलवार, इम्पॅक्ट खेळाडू ओजस गडकरी, मालिकावीर व सामनावीर सचिन तलवार यांना चषक देवून गौरविले. अंतिम पंच म्हणून ख्रिस्ती हसन व ईश्वर हेगडे यांनी काम पाहिले.









