वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्कॉटलंडची कर्णधार कॅथरीन ब्राईसला एप्रिल महिन्यातील सर्वोत्कृट महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आल्याचे आयसीसीने जाहीर केले. पाकिस्तान येथे झालेल्या महिलांच्या विश्व चषक पात्रता फेरीमध्ये 27 वर्षीय स्कॉटलंडच्या कॅथरीन ब्राईसने सर्वाधिक 73.25 च्या सरासरीने 293 धावा केल्या. या पुरस्कारासाठी पाकिस्तानची फातिमा सना, वेस्ट इंडिजची हॅली मॅथ्युज या कर्णधारांचीही नावे होती. मात्र अष्टपैलू कामगिरीमुळे कॅथरीन ब्राईसला आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील पुरस्कारासाठी निवडण्यात आले. पाकिस्तान येथे झालेल्या चॅम्पियनशीप स्पर्धेतील एका सामन्यात तिने 131 धावांची शतकी खेळी करत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. फातिमा सना व विंडीजची हॅली मॅथ्युज या दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिल्या.
विश्वचषक पात्रता फेरीत आपल्या गोलंदाजीवर ब्राईसने 6 गडीही बाद केले. कॅथरीनने उत्तम कामगिरी केली. मात्र स्कॉटलंड संघ विश्वचषकासाठी पात्र ठरु शकला नाही. त्यांनी पाच सामन्यांत 4 गुणांसह चौथे स्थान मिळविल्याने भारतात होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत स्कॉटलंड अपात्र ठरला.









