ई श्रम पोर्टलवरील आकडेवारीमधून माहिती
वृत्तसस्था/ नवी दिल्ली
भारतात असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांमध्ये प्रवेश मिळावा या उद्देशाने ई-श्रम पोर्टल चालवले जात आहे. अलीकडेच, एप्रिल 2025 साठी नोंदणीकृत कामगारांचा डेटा ई-श्रम पोर्टलवर दिसून आला आहे. या आकडेवारीत महिलांची स्थिती चांगली असल्याचे पहावयास मिळाले. या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एप्रिल 2025 मध्ये एकूण नोंदणीकृत कर्मचाऱ्यांमध्ये पाहता महिलांचे प्रमाण 60.60 टक्के आहे, तर फक्त 39.39 इतकी संख्या पुरुषांची आहे.
भारताच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ई-श्रमवर नोंदणीकृत कामगारांपैकी 39.39 टक्के पुरुष होते तर 60.60 टक्के महिला होत्या. यावरून असे दिसून येते की या प्लॅटफॉर्मची सर्वांमध्ये व्यापक पकड आहे, ज्यामुळे कामगारांना महत्त्वाच्या सामाजिक सुरक्षिततेत प्रवेश मिळण्यास मदत होते.
मार्च 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय डेटाबेस पोर्टल ई-श्रमवर असंघटित क्षेत्रातील कामगारांची एकूण 30.68 कोटी नोंदणी झाली होती, त्यापैकी 53.68 टक्के महिला होत्या. आता एप्रिल महिन्यात नोंदणीकृत एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.
ई-श्रम पोर्टल म्हणजे काय?
भारत सरकारने 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टल सुरू केले. हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये स्थलांतरित कामगार, रस्ते कामगार, घरकामगार, शेती कामगार आणि मजूर अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार केला जातो. हा डेटाबेस कर्मचाऱ्यांच्या आधार कार्डशी जोडला जातो. जेणेकरून त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि आयुष्मान भारत योजनेसारख्या इतर योजनांचा सहज लाभ घेता येईल. हे पोर्टल 22 भारतीय भाषांमध्ये माहिती प्रदान करते. हे पोर्टल केवळ नोंदणी करत नाही तर रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि 13 हून अधिक सरकारी योजनांमध्ये प्रवेश देखील प्रदान करते.









