म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्यावर : परिणाम होणार नसल्याच्या दाव्याचा निषेध
पणजी : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून कर्नाटकने म्हाददीचे पाणी वळवले तर संपूर्ण गोव्यावर फारसा परिणाम होणार नाही, असा दावा केला असून रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने (आरजीपी) त्याला जोरदार हरकत घेऊन निषेध केला आहे. मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत आरजीपी प्रमुख मनोज परब आणि पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना परब यांनी, एनआयओच्या म्हणण्यानुसार म्हादई जल लवादाने परवानगी दिल्यानुसार भांडुरा नाल्यातून 2.18 टीएमसी पाणी वळवल्याने गोवा-कर्नाटक सीमेवरील (नदीच्या) विसर्गावर थोडासाच परिणाम होईल. मात्र कळसा प्रकल्पामुळे म्हादई अभयारण्याच्या उत्तर भागात 1.72 टीएमसी पाणी वळवले तर याचा मोठा परिमाण होणार आहे, असे म्हटले आहे, अशी माहिती दिली. त्याही पुढे जाताना एनआयओने या अहवालात सदर प्रकल्पांमुळे मांडवी नदीच्या मुखाशी किंवा कुंभारजुवे कालव्यातील जलवाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही म्हटले आहे. मांडवीतील जलवाहतूक ही भरती-ओहोटीमुळे शक्य होते. जेव्हा म्हादईचा नैसर्गिक प्रवाह कमी असतो तेव्हा देखील वाहतूक शक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे, असे सांगून परब यांनी एनआयओने गोव्याशी केलेली ही गद्दारी असल्याचा आरोप केला व या दाव्याचा निषेध केला.
स्थानिक पक्षाचे सरकार ही काळाची गरज
ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप, काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांची सरकारे आहेत, त्यांनी स्थानिक प्रश्नांकडे कधीच गांभीर्याने किंवा अत्मियतेने पाहिलेले नाही, हा इतिहास आहे, म्हणुनच गोव्यासारख्या राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून म्हादईचा प्रश्न सुटत नाही. किंबहुना असे प्रश्न चिघळत ठेवण्यातच हे राष्ट्रीय पक्ष धन्यता मानत आहेत, असा दावा रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी केला आहे. त्यासाठीच राज्यात स्थानिक पक्षाचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, वर्ष 1989 पासून गोवा आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या म्हादई पाणीवाटपाचा प्रश्न अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्याने त्यांनी म्हादई वळविण्याचे अटोकाट प्रयत्न चालविले आहेत. त्यादृष्टीने त्यांचे कामही जोमाने सुरू झालेले आहे. मात्र या दोन्ही पक्षांच्या राजकीय भांडणात म्हादईचा बळी जात आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, म्हादईचा मुद्दा घेऊन जी नाटके विद्यमान सरकारने चालविली आहेत, त्यांना छेद देणारा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यावरून भविष्यात गोमंतकीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. सध्यातरी म्हादई वळविण्यात आलेली नसल्यामुळे लोकांना पाण्याचे महत्व समजलेले नाही. परंतु ज्या दिवशी म्हादई वळविण्यात कर्नाटकला यश येईल, तेव्हा आम्हाला पाण्याचे जे चटके सहन करावे लागतील त्यांना तोड नसेल, असे परब म्हणाले.









