नामफलक गायब झाल्याने कार्यालय ओळखणे मराठी भाषिकांना कठीण
वार्ताहर/नंदगड
राज्यात सलग दोनवेळा आदर्श पंचायतीचा पुरस्कार मिळालेल्या नंदगड ग्राम पंचायतीच्या नामफकावरून मराठी गायब झाली आहे. नंदगड व परिसरात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील बोलीभाषा आणि व्यवहाराची भाषा मराठी असूनही गावचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्राम पंचायतीच्या फलकावरून मराठी भाषाच गायब झाल्याने हे कोणते कार्यालय आहे हे ओळखणे आता मराठी भाषिकांना कठीण झाले आहे. नंदगड ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून पंचायतीवर मराठी भाषेत नामफलक होता.
बदलत्या काळानुसार मराठीबरोबरच कन्नड भाषेतील फलक लिहिण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही भाषिक बांधवांना हे ग्राम पंचायतीचे कार्यालय आहे हे माहीत होत होते. नंदगड ग्राम पंचायतीचे गेले कित्येक वर्षापासून जुन्या इमारतीत कार्यालय होते. दोन वर्षांपूर्वीपासून नव्याने अत्याधुनिक इमारत उभी करून त्या ठिकाणी ग्राम पंचायतीचे कार्यालय करण्यात आले आहे. सध्या जुन्या आणि नव्या इमारतीतून ग्राम पंचायतीचा कारभार चालतो. दोन्ही इमारतीवर कन्नड बरोबर मराठीत भाषेचा फलक होता. त्यामुळे सर्व काही सुरळीत चालले होते. डिजिटल फलकाच्या निमित्ताने गेल्या चार दिवसापासून ग्राम पंचायतच्या नव्या इमारतीवर केवळ कन्नड भाषेतच फलक लावण्यात आला आहे.
तर जुन्या इमारतीवरही केवळ कन्नड भाषेतच फलक आहे. मराठी भाषा ग्राम पंचायतीच्या फलकावरून जाणीवपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. नंदगड ग्रा.पं.मध्ये एकूण 23 सदस्य आहेत. सर्वच सदस्यांना मराठी भाषा अवगत आहे. तर यापैकी काही सदस्य मराठी भाषेत शिकलेले आहे. गावच्या समस्याबाबत ग्रा.पं.तीत मराठीमध्ये चर्चा होते. सदस्यांमध्ये कोणत्याही भाषेबद्दल द्वेष नाही. असे असताना मराठी भाषेला डावलून केवळ कन्नड भाषेतच फलक लिहिणे यामागचे गौडबंगाल काय, असाच प्रश्न पडला आहे.
दोन्ही भाषांतून फलक लावण्याची सूचना केली होती
नंदगड ग्राम पंचायतीच्या इमारतीवर पूर्वीपासून मराठी व कन्नड दोन्ही भाषेतील फलक होते. आता आणि यापुढेही दोन्ही भाषेत फलक राहिल्यास जनतेला हे कोणते कार्यालय आहे हे ओळखण्यास सोयीचे होते. दोन्ही भाषेत फलक लावण्यासाठी ग्रामपंचायत पिडीओना सूचना केली होती. परंतु एकाच भाषेत फलक लावून पिडीओनी जनतेत गैरसमज निर्माण केला आहे. त्याबद्दल खेद व्यक्त केला असून दोन्ही भाषेत फलक लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
– ग्रा. पं. अध्यक्ष यल्लापा गुरव









