जुई नारकर, ग्रीष्मा थोरात, आनंदी सांगळे यांना रौप्य
प्रतिनिधी/ राजगीर
महाराष्ट्राच्या मुलींनी 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सायकलिंगमध्ये एक, वेटलिफ्टिंगमध्ये 2 रौप्यपदकाची कमाई करीत दिवस गाजविला. सायकलिंगमध्ये मुंबईच्या जुई नारकरने तर वेटलिफ्टिंगमध्ये ग्रीष्मा थोरात, आनंदी सांगळे यांनाही रौप्यपदक जिंकले.
ट्रॅक सायकलिंगमध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी आज रोड सायकलिंगमध्येही पदकाचे खाते उघडले. मुलींच्या 20 किलोमीटर रोड रायकलिंग स्पर्धेत जुई नारकरने 32 मिनिटे 49.291 सेंकद वेळेसह महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले. मुंबईची ही खेळाडू पंकज मार्लेशा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. राजस्थानच्या मंजू चौधरीने 32 मिनिटे 15.142 सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. राजस्थानचीच रुख्मणी 33 मिनिटे 40.233 सेंकद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. लवकर सुरुवात केल्यामुळे रुख्मणीला एक सेंकद वेळेची पेनल्टी मिळाली. राजगीरमध्ये सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या ग्रिष्मा थोरातने रौप्यपदकाची कमाई केली. ठाण्याच्या या खेळाडूने 76 किलो गटात स्नॅचमध्ये 77 किलो, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 95 किलो असे एकूण 172 किलो वजन उचलून हे रूपेरी यश संपादन केले. ती मधुरा सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. उत्तर प्रदेशच्या किर्ती कुमारीने स्नॅचमध्ये 81 किलो, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 102 किलो असे एकूण 183 किलो वजन उचलत सहजपणे सुवर्णपदक जिंकले. तमिळनाडूची हसीना शरीन ही (स्नॅचमध्ये 76 किलो, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 89 किलो) एकूण 165 किलो वजन उचलत कांस्यपदक पटकाविले.
मनमाडच्या आनंदी सांगळेने 81 किलो गटात स्नॅचमध्ये 80 किलो, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 95 किलो असे एकूण 175 किलो वजन उचलून रूपेरी यश संपादन केले. 1 किलो वजनाने आनंदीचे सुवर्णपदक हुकले. नाशिकमधील मनमाडच्या खेळाडूंच तिसरे पदक आहे. तमिळनाडूच्या के. ओवीयाने (स्नॅचमध्ये 76 किलो, क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 100 किलो) एकूण 176 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले, तय आंध्र प्रदेशची अल्लू रेवाथी हिने (स्नॅचमध्ये 78 किलो, क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 95 किलो) एकूण 173 किलो वजन उजलत कांस्यपदक जिंकले.









