41 सुवर्णासह पदकतक्यात अव्वल स्थान
पाटना (बिहार)
तब्बल सात स्पर्धा विक्रमांची नोंद करीत 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचे शतक झळकावले. 41 सुवर्णांसह एकूण 101 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने पदकतक्यातील आपले अव्वल स्थान आणखी बळकट केले.
वेटलिफ्टिंग पाठोपाठ अॅथलेटिक्समध्येही स्पर्धाविक्रमाला गवसणी घालत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी खेलो इंडिया स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले आहे. स्पर्धेच्या 9 व्या दिवशी महाराष्ट्राने पदकाचे शतक झळकविण्याचा पराक्रम सलग दुसऱ्या स्पर्धेत केला. 41 सुवर्ण, 32 रौप्य व 28 कांस्यपदकाची कमाई करीत एकूण 101 पदकां चा पल्ला महाराष्ट्राने गाठला आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ राजस्थान, कर्नाटक आणि हरियाणा यांची क्रमवारी आहे. नवव्या दिवशी सकाळच्या सत्रात जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राने 5 सुवर्णांसह 10 पदके जिंकून पदकांचे शतक पूर्ण केले.
पदकांचे शतक पूर्ण केल्याबद्दल क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व पदकविजेत्यांचे अभिनंदन केले. क्रीडामंत्री भरणे म्हणाले, बिहार स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वच खेळात वर्चस्व गाजवले आहे. विजेतेपदही महाराष्ट्र जिंकणार याचा प्रत्यय हा 100 पेक्षा अधिक पदके जिंकून दिला आहे. विक्रमी कामगिरीतही महाराष्ट्राचा जयजयकार होत आहे. युवा खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
स्पर्धा विक्रमातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. वेटलिफ्टिंग अस्मिता ढोणेने 2, साईराज परदेशीने 3, अॅथलेटिक्समध्ये सैफ चाफेकर, रोहित बिन्नार यांनी प्रत्येकी 1 असे एकूण 7 स्पर्धा विक्रम प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावापुढे झळकले आहे. कराडच्या अस्मिता ढोणेने 49 किलो वजनी गटात क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 73 एकूण 162 किलोची कामगिरी करीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. मनमाडच्या साईराज परदेशीने विक्रमाची हॅट्ट्रिक केली. साईराजचे 81 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 139 किलो, क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 171, एकूण 311 किलो असे 3 विक्रमांची नोंद केली. गत तामिळनाडू स्पर्धेतही साईराजने विक्रमाचा पराक्रम केला होता.
अॅथलेटिक्समध्ये आहिल्यानगरच्या रोहित बिन्नारने 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत 8 मिनिटे 24.9 सेंकद वेळात सुवर्ण धाव घेत नवा स्पर्धा विक्रमाचे शिखर गाठले. 110 मीटर अडथळा शर्यतीत मुंबईच्या सैफ चाफेकरने 13.48 सेकंदाची विक्रमी धाव घेतली.









