पाकिस्तानी ड्रोन कोसळला होता कारवर
वृत्तसंस्था/ फिरोजपूर
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात 9 मे रोजी एका पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात जखमी झालेल्या सुखविंदर कौर या महिलेचा लुधियानाच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 50 वर्षीय सुखविंदर या ड्रोन हल्ल्यात जखमी झालेल्या परिवाराच्या तीन सदस्यांपैकी एक होत्या. पंजाबमध्ये सीमेपलिकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये हा पहिला नागरी बळी आहे.
पाकिस्तानचा गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यात जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये आतापर्यंत 26 जण मृत्युमुखी पडले आहेत. सुखविंदर ड्रोन हल्ल्यात मोठ्या प्रमाणात होरपळल्या गेल्या होत्या. पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष त्यांच्या कारवर कोसळून आग लागली होती अशी माहिती फिरोजपूरच्या उपायुक्त दीपशिखा शर्मा यांनी दिली.
पतीची प्रकृतीही गंभीर
या ड्रोन हल्ल्यात सुखविंदर यांचे पते 55 वर्षीय लखविंदर सिंह देखील होरपळले आहेत. त्यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. त्यांच्यावर लुधियानाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांचा 24 वर्षीय मुलगा जसवंत सिंह जखमी झाला आहे. त्याची प्रकृती सुधारत आहे.









