भरधाव कार झाडाला धडकली : पेन्सिल्वेनिया येथे दुर्घटना
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया येथे झालेल्या एका रस्ते दुर्घटनेत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांची कार एका झाडाला धडकली होती अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. कारमध्ये पुढील सीटवर बसलेला अन्य प्रवासी जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुर्घटनेचे वृत्त कळताच न्यूयॉर्क येथील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने शोक व्यक्त केला.
क्लीवलँड स्टेट युनिव्हर्सिटीचे दोन भारतीय विद्यार्थी मानव पटेल (20 वर्षे) आणि सौरव प्रभाकर (23 वर्षे) यांचा रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या जीवितहानीबद्दल कळल्यावर मोठे दु:ख झाले. या अवघड काळात आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या परिवारांसोबत आहेत असे महावाणिज्य दूतावासाने पोस्ट करत म्हटले आहे.
पीडित परिवारांच्या संपर्कात
वाणिज्य दूतावास पीडित परिवारांच्या संपर्कात असून त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ब्रेकनॉक टाउनशिपमध्ये पेन्सिल्वेनिया टर्नपाइकवर ही रस्ते दुर्घटना घडली होती. पटेल आणि प्रभाकर यांची कार एका झाडाला धडकल्यावर एका पूलावर जाऊन आदळली होती. ही कार प्रभाकर चालवत होता अशी माहिती लँकेस्टर काउंटी कोरोनर कार्यालय आणि पेन्सिल्वेनिया प्रांत पोलिसांकडून देण्यात आली. मानव आणि प्रभाकरचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.









