सेन्सेक्स 1282, तर निफ्टी 346.35 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांमध्ये मजबूत स्थिती राहिल्याने सोमवारी भक्कम कामगिरी करणाऱ्या बाजारात दुसऱ्या दिवशी नफा वसुली राहिली. यात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले आहेत. सोमवारी बाजाराने एक दिवसीय कामगिरीत चार वर्षांमधील सर्वाधिक तेजी प्राप्त केली होती. मात्र ते वातावरण कायम ठेवण्यास बाजाराला अपयश आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स मंगळवारी 180 अंकांच्या घसरणीसह सुरु झाला. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 1281.68 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 81,148.22 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 346.35 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 24,578.35 वर बंद झाला आहे.
विविध क्षेत्रांमधील कामगिरीचा आढावा पाहिल्यास यामध्ये मंगळवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण राहिली आहे. यासह एफएमसीजी, आर्थिक सर्व्हिस कंपन्या, ऑटोमोबाईल आणि खासगी बँक यांचा यामध्ये समावेश राहिला आहे. अन्य कंपन्यांमध्ये सार्वजनिक बँका आणि फार्मा क्षेत्रामधील समभागांमध्ये विक्रीचा कल राहिल्यानंतरही तेजीची नोंद केली आहे.
घसरणीची मुख्य कारणे :
1.भारत-पाकिस्तान तणावाची भीती
भारत-पाकिस्तान तणावाबाबत अजूनही अनिश्चितता असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. इक्वॉनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक जी चोक्कलिंगम म्हणाले की, गुंतवणूकदार सावध आहेत. त्यांना भीती आहे की पाकिस्तानकडून कारवाई केल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
- अमेरिका-चीन व्यापार चर्चा भारतासाठी नकारात्मक
अमेरिका आणि चीनने 90 दिवसांसाठी व्यापार युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध कमी झाले. या कराराअंतर्गत, अमेरिका चिनी आयातीवरील सध्याचे शुल्क 145 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत कमी करेल. तर चीन अमेरिकन वस्तूंवरील शुल्क 125 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करेल. विश्लेषकांच्या मते, हे पाऊल भारतासाठी नकारात्मक असू शकते कारण चीन एक प्रमुख प्रतिस्पर्धी बनू शकतो.
- नफा बुकिंग
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक (टेक्निकल रिसर्च) जिगर एस पटेल यांच्या मते, निर्देशांक 25,080 च्या आसपासच्या प्रमुख प्रतिकार क्षेत्राला स्पर्श करत असताना ही घसरण दिसून आली. ते म्हणाले की गुंतवणूकदारांना अनेकदा अशा क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव अपेक्षित असतो, जो येथे नफा घेण्याच्या स्वरूपात आला. यामुळे बाजारातील अलिकडच्या चढउतार थांबले.
जागतिक बाजार
दरम्यान, अमेरिका-चीन व्यापार करारानंतर वॉल स्ट्रीटने तेजी दाखवल्यानंतर मंगळवारी आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली. जपानचा निक्केई 2.17 टक्क्यांनी आणि टीओपीआयसीएस 1.77 टक्क्यांनी वधारला. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.13 टक्क्यांनी वधारला.









