वृत्तसंस्था / शिकागो, अमेरिका
येथे सुरू असलेल्या वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारताचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. एकेरीत चारही खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. महिला एकेरीत खेळणारी एकमेव भारतीय अनाहत सिंगला इजिप्तच्या फैरोझ अबोल्खीरकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. अनाहतने दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली होती. पण शेवटी तिला 7-11, 11-8, 4-11, 3-11 असा पराभव स्वीकारावा लागला. 17 वर्षीय अनाहत जागतिक क्रमवारी 62 व्या स्थानावर असून आधीच्या फेरीत तिने जागतिक 28 व्या मानांकित अमेरिकेच्या मेरिना स्टेफानोनीला पराभवाचा धक्का दिला होता.
पुरुष एकेरीत अभय सिंग, वीर छोत्रानी, रमित टंडन दुसऱ्या फेरीत पराभूत झाले. अभयला जागतिक 13 व्या मानांकित इजिप्तच्या युसेफ इब्राहिमने 0-3 (6-1, 6-11, 9-11) असे हरविले तर छोत्रानीला इजिप्तच्या अग्रमानांकित अली फरागने 1-3 (11-7, 7-11, 3-11, 10-12) असे नमविले. टंडनने मात्र आठव्या मानांकित इंग्लंडच्या मारवान एल्शोरबॅगीला जोरदार लढत दिली. पण अखेर त्याला 2-3 (9-11, 7-11, 11-5, 11-8, 8-11) असा निसटता पराभव पत्करावा लागला.









