बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून हरियाणात वास्तव्य
वृत्तसंस्था/ शिमला
भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान हरियाणा पोलिसांनी हिसारमध्ये 39 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण हिसारमधील हांसी येथे बेकायदेशीरपणे राहत होते. अटक केलेल्यांमध्ये 14 पुरुष, 11 महिला आणि 14 मुले आहेत. यातील बहुतांश लोक वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. ते ओळखपत्र म्हणून कोणताही पुरावा दाखवू शकले नाहीत. चौकशीदरम्यान या लोकांनी आपण सीमा ओलांडून बांगलादेशहून आल्याची कबुली दिली आहे. त्यांना सीमा ओलांडण्यास कोणी मदत केली आणि ते हरियाणामध्ये कसे पोहोचले याचा तपास सुरक्षा संस्था करत आहेत.
एका गुप्त माहितीच्या आधारे हरियाणा पोलिसांनी हांसीमधील तोशाम रोडवरील एका वीटभट्टीतून बांगलादेशींना अटक केली. आता कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. कायदेशीर तरतुदींबाबत माहिती गोळा केली जात असल्याचे पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यास सुरुवात केली असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना अटक करण्याचे सत्र सध्या सुरू आहे.








