माजी पाकिस्तानी राजदूताचे मोठे वक्तव्य
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याने मोठा संघर्ष टळला आहे. या पार्श्वभूमीवरील अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. अमेरिकेचे समर्थन नसते तर पाकिस्तान मागील 75 वर्षांपासून भारताचा सामना करू शकला नसता. अमेरिकेच्या सहाय्यामुळे पाकिस्तान भारतासोबत प्रतिस्पर्धा करण्यास सक्षम ठरला असे उद्गार हक्कानी यांनी काढले आहेत. पाकिस्तानला आता स्वत:चे विदेश धोरण आणि रणनीतिक भागीदारीबद्दल पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे, खासकरून भारतासोबतच्या संबंधांच्या संदर्भात, असे हक्कानी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानला भूतकाळात भरीव सैन्य मदत
2002 पासून 2013 दरम्यान अमेरिकेने पाकिस्तानला 26 अब्ज डॉलर्सची सैन्य मदत केली होती. यात सैन्य उपकरणांची विक्री देखील सामील होती. अमेरिकेने पाकिस्तानला 18 नवी एफ-16 लढाऊ विमाने, 8 पी-3सी ओरियन सागरी गस्त विमान, 6000 टीओडब्ल्यू रणगाडाभेदी क्षेपणास्त्रs, 500 एएमआरएएएम मिसाइल्स, 6 सी-130 ट्रान्सपोर्ट विमाने, 20 कोब्रा अटॅक हेलिकॉप्टर आणि पेरी-क्लास मिसाइल फ्रिगेट पुरविली होती. यामुळे पाकिस्तानला स्वत:च्या सैन्य क्षमतेला विस्तार देण्यास मोठी मदत मिळाली होती. पाकिस्तानने या शस्त्रास्त्रांचा वापर भारताच्या विरोधात केला. खासकरून एफ-16 ला त्याने भारताच्या विरोधातील संघर्षादरम्यान वापरले आहे. अमेरिका अद्याप एफ-16 ची दुरुस्ती आणि देखभालीसाठी पाकिस्तानला मोठा निधी देत असतो. 2009-14 दरम्यान अमेरिकेने ‘केरी लुगर बिल’ अंतर्गत दरवर्षी 1.5 अब्ज डॉलर्सचा निधी पाकिस्तानला पुरविला. 2022 मध्ये बिडेन प्रशासनाने पाकिस्तानला 450 दशलक्ष डॉलर्सच्या एफ-16 फ्लीट मेंटेनेन्स सहाय्य प्रदान केले होते, यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.









