सेन्सेक्स 2975 अंकांनी तर निफ्टी 916 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअरबाजारात सोमवार हा जबरदस्त तेजीची कामगिरी नोंद करणारा ठरला. भारत व पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधीने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक साधारण 4 टक्के इतके वाढत बंद होण्यात यशस्वी झाले आहेत.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 2975 अंकांची उसळी घेत 82,429 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 916 अंकांच्या जबरदस्त तेजीसोबत 24,924 अंकांवर बंद झाला. दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या समभागांनी दमदार कामगिरीच्या जोरावर बाजाराला आधार दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू झाली असून दुसरीकडे अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार कराराला ब्रेक देण्यात आल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअरबाजारावर सोमवारी पाहायला मिळाला. सोमवारी बीएसई सेन्सेक्स 1 हजार अंकांच्या उसळीसह 80,803 च्या स्तरावर खुला झाला तर या निर्देशांकाने एकावेळी इंट्रा डे दरम्यान 82,495 चा स्तरही गाठला होता. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीही सकाळी दमदार तेजीसोबत 24,420 च्या स्तरावर खुला झाला. व्यवहारादरम्यान निफ्टीने 24,944 पर्यंत मजल मारली होती. शुक्रवारी सेन्सेक्स 880 अंकांनी घसरत 79,454 अंकांवर तर निफ्टी 265 अंकांनी घसरत 24,008 अंकांवर बंद झाला होता.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 16 लाख कोटी रुपयांची भर सोमवारी दिसून आली. बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 432.57 लाख कोटींवर पोहचले आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर बाजार भांडवल मूल्य 417.01 लाख कोटी इतके होते.
संधीमुळे तसेच भारताने पाकला दिलेले योग्य प्रत्युत्तर व संयमी भूमिका यामुळे गुंतवणूकदारांचा सोमवारी कल सकारात्मक पाहायला मिळाला. भारताच्या संरक्षणविषयक मजबुत तयारीनेही गुंतवणूकदार समाधानी होते. अलीकडची व्याजकपात, विदेशी गुंतवणूकीचा वाढता ओघ याबाबीही बाजाराला पाठबळ देत आहेत.
अमेरिका आणि चीन यांच्या व्यापार तणाव कमी होताना दिसणार आहे. दोन्ही देशांमध्ये आयात शुल्क कमी करण्याबाबत सहमती झाली आहे. याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम दिसला.









