कोळसा मंत्र्यांनी दिली माहिती : कोळशाचा पुरेसा साठा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मान्सून मे अखेर सक्रीय होण्याची शक्यता असून येत्या मान्सूनमध्ये कोळशाची कोणतीही टंचाई जाणवणार नसल्याची माहिती कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी नुकतीच दिली आहे.
एप्रिल महिन्यात देशांतर्गत कोळसा उत्पादनामध्ये 3.6 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे येत्या मान्सून कालावधीमध्ये कोळशाची कोणतीही टंचाई नसणार असल्याची माहिती कोळसामंत्री जी किशन रेड्डी यांनी दिली असून सदरच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने कोळसा उत्पादनात काहीशा अडचणी जाणवत असतात. ऊर्जा केंद्रांना कोळशाचा पुरवठा प्रभावित होण्याचीही शक्यता असते. परंतु या खेपेला कोळशाचे उत्पादन चांगले करण्यात आल्याने टंचाई अजिबात नसल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोळशाचा पुरेसा साठा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एप्रिलमध्ये 81 दशलक्ष टन उत्पादन
देशातील कोळसा उत्पादन यंदाच्या एप्रिलमध्ये 3.6 टक्के वाढून 81.57 दशलक्ष टन इतके राहिले होते. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये 78.71 दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादन घेतले गेले होते. 30 एप्रिलपर्यंत पाहता देशाकडे 125.76 दशलक्ष टन इतका कोळसा आर्थिक 2026 वर्षाकरीता आहे. मागच्या वर्षी हाच साठा 102.41 दशलक्ष टन इतका होता. एकंदर कोळसा उत्पादनात वाढ करत भारत याबाबतीतले आयातीत अवलंबीत्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.









