सत्ता कायम राखण्यासाठी आबिटकर सक्षमपणे लढत देणार
By : अनिल कामीरकर
कोल्हापूर (गारगोटी) : भुदरगड तालुक्यात चार जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आठ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. तालुक्यात एकही नगर परिषद नाही. पंचायत समितीवर सत्तेसाठी नेहमीच रस्सीखेच असते. पंचायत समितीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर गटाची सत्ता होती, आता ही सत्ता कायम राखण्यासाठी आबिटकर सक्षमपणे लढत देणार असून त्यांचा अश्वमेध रोखणार कोण, याबाबत उत्सुकता आहे.
गत पंचवार्षिक पंचायत समितीत सहा सदस्य पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे तर भाजपचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे विरोधी दोन सदस्य होते. कालांतराने भाजपचे सदस्य आक्काताई नलवडे याही आबिटकर गटात सामील झाल्या. गारगोटी, पिंपळगाव, कडगाव, पाटगाव, कुर, आकुर्डे असे चार जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत.
त्यापैकी एक आबिटकर गट, एक माजी आमदार बजरंग देसाई गट, दिनकरराव जाधव गट, के. पी. पाटील गट असे प्रत्येकी एक एक जागा मिळाल्या होत्या. पाच वर्षात पंचायत समितीवर आबिटकर गटाची सत्ता होती. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून कालचे मित्र आजचे शत्रू तर कालचे शत्रू आजचे मित्र बनले आहेत.
मागील निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. तर राहुल देसाई यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणूक लढवली होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सलग तिसरा विजय, कॅबीनेट मंत्रीपद त्यामुळे त्यांची घोडदौड आजही कायम आहे.
त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत, अल्केश कांदळकर, देवराज बारदेस्कर यांची साथ मिळाल्यास त्यांच्या ताकतीमध्ये भरच पडणार आहे. तर आबिटकर यांचा अश्वमेध रोखण्यास माजी आमदार के. पी. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, माजी उपसभापती सत्यजीतराव जाधव यांना कंबर कसावी लागणार आहे.
तालुक्यात काँग्रेस एकसंध राहिल्यास आणि माजी आमदार पुत्र राहुल देसाई –सत्यजीतराव जाधव यांनी त्यांचे नेतृत्व केल्यास काँग्रेसमध्ये आशादायी चित्र निर्माण होऊ शकते. पण काँग्रेसअंतर्गत असणारे विविध गट एकत्र कोण आणणार हा देखील गुंतागुंतीचा प्रश्न आहे.
कारण येथील काँग्रेस केवळ कागदावर बळकट दिसते, पक्षीय पदे वाटण्यात धन्यता मानणारी ही मंडळी गावोगावच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यात मागे पडतात. आबिटकर बंधुंनी तालुक्यात लावलेला कामाचा धडाका त्यांना बळ देणारा असुन त्यांचा अश्वमेध कायम आहे. त्यांच्या विरोधात प्रबळ आघाडी झाली तरच त्यांना लढत दिली जाऊ शकते.








