डिचोली : शिरगाव येथील श्रीदेवी लईराईच्या जत्रोत्सवात अग्निदिव्य मार्गक्रमणावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर देवस्थानने या जत्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व धोंडगणांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे, यासंबंधीची सार्वजनिक सूचना देवस्थान समितीने काल रविवारी 11 मे रोजी सकाळी जारी केली आहे. त्यानुसार सर्व धोंडगणांना आपला ओळख दर्शविणारा दाखला व दोन पासपोर्ट साईज फोटो देवस्थान समितीकडे सुपूर्द करावे लागतील.
जत्रोत्सवात सहभागी होणाऱ्या धोंडगणांना यापुढे देवस्थान समिती मार्गदर्शन करणार आहे. जत्रोत्सवाच्या काळात सोवळे व्रत करणाऱ्यांना धोंडगणांच्या तळावर जाऊन जत्रोत्सवातील सहभागा विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच त्यांच्याशी झालेल्या प्रकाराबद्दल चर्चाही केली जाणार आहे. लवकरच या मोहिमेला देवस्थान समिती सुऊवात करणार आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीतर्फे या प्रकरणाशी संबंधित तसेच कारणीभूत अशा सर्व कारणांची शहानिशा व चौकशी केली आहे. या चौकशी समितीचा अहवाल सरकारदरबारी दाखल झाला असला तरी त्यातून कोणावर याची जबाबदारी घालण्यात आली आहे, याची अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही काही प्रसारमाध्यमांतून या प्रकरणात प्रशासनातील जबाबदार अधिकारी, पोलिस, पंचायत, सचिव, पंचायत मंडळ व देवस्थानलाही जबाबदार धरल्याचे समोर आले आहे.









