कणबर्गी रोडवरील हॉटेलमधील घटना : मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू
बेळगाव : केवळ दीडशे रुपये बिलाची विचारणा केल्याने तरुणाच्या मारहाणीत जखमी झालेल्या एका बारमधील वेटरचा मृत्यू झाला आहे. कणबर्गी रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. वेटरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. निलेशकुमार कृष्णा भोवी (वय 39) राहणार अंजनेयनगर असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी वेटरचे नाव आहे. या प्रकरणी के. के. कोप्प येथील रुद्रगौडा बसाप्पा पाटील (वय 32) याला माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 9 मे रोजी सायंकाळी कणबर्गी रोडवरील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली आहे. मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या निलेशकुमारचा भाऊ मारुती कृष्णा भोवी (वय 37) हा युवकही त्याच बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. या बारमध्ये मद्यपान करण्यासाठी आलेल्या रुद्रगौडाचे दीडशे रुपये बिल झाले होते. दीडशे रुपये बिलापोटी रुद्रगौडा व निलेशकुमार यांच्यात वादावादी झाली. काऊंटरवर बिल भरा, असे निलेशकुमारने सांगितले.
त्यावेळी रुद्रगौडाने निलेशकुमारच्या जोरदार कानशिलात लगावली. मारहाणीनंतर निलेशकुमार खाली कोसळला. याचवेळी त्याचा भाऊ कृष्णालाही बोलावून घेण्यात आले. रुद्रगौडाने या दोघा जणांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही सांगण्यात आले. सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून शनिवारी 10 मे रोजी सकाळी पुढील उपचारासाठी त्याला हुबळी येथील किम्सला हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून निलेशकुमारचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









