शैक्षणिक जिल्ह्यात 12 हजार दहावीचे विद्यार्थी अनुत्तीर्ण : निकाल वाढीसाठी विशेष प्रयत्न
बेळगाव : नुकताच जाहीर झालेला दहावीचा निकाल बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी विचार करायला लावणारा आहे. शैक्षणिक जिल्ह्यात 19584 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 12152 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे निकाल वाढविण्यासाठी शिक्षण विभागात शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. शुक्रवार दि. 2 रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 31,771 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 19,584 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उर्वरित 12,187 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांना परीक्षेची दुसरी संधी देण्यात आली आहे. परंतु अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
निकाल वाढीसाठी विशेष वर्ग
एसएसएलसी-2 परीक्षा 26 मे पासून घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी काही शाळांनी विशेष वर्ग सुरू केले आहेत. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे.
परीक्षा शुल्क नसल्याने दिलासा
यावर्षी दहावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहेत. प्रथमच असा प्रयोग शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या केवळ रेग्युलर विद्यार्थ्यांनाच ही संधी देण्यात आली आहे. इतर विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेची फी भरावी लागत आहे.










