2 लाख 49 हजार अर्ज दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
एसएसएलसी मुख्य परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाने दुसरी संधी उपलब्ध करून दिली आहे. 26 मे ते 2 जून दरम्यान एसएसएलसी-2 परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी राज्यातील 2 लाख 49 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत.
दहावी मुख्य परीक्षेत 2 लाख 76 हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांनी एसएसएलसी-2 परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत 2 लाख 49 हजार अर्ज परीक्षा मंडळाकडे दाखल करण्यात आले आहेत. काही विद्यार्थ्यांचे एक-दोन विषय राहिले असल्याने त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वेळेत पुढील प्रवेश घेता यावा यासाठी परीक्षा 2 व 3 घेण्यात येत आहे. नुकतेच या परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. सध्या विभागवार आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी, परीक्षेच्या अगोदर चार दिवस आधी जाहीर केली जाईल, असे शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.









