वृत्तसंस्था/ तैपेई
भारताचे युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी व उन्नती हुडा यांची तैपेई ओपन सुपर 300 स्पर्धेतील विजयी घोडदौड उपांत्य फेरीत रोखली गेली.
20 वर्षीय आयुष हा 2023 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचा कांस्यविजेता असून त्याने उपांत्य लढतीत जागतिक सातव्या मानांकित चौ तिएन चेनला झुंजार लढत दिली. पण या अनुभवी खेळाडूविरुद्ध ही लढत आयुषला 18-21, 17-21 अशी गमवावी लागली. तैपेईच्या चेनला या स्पर्धेचा संभाव्य विजेता मानले जात आहे. आयुषने आधीच्या फेऱ्यांत त्याने कॅनडाचा ब्रायन यांग, आपल्याच देशाचा किदाम्बी श्रीकांत आणि ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप उपविजेता ली चिया हाओ यांना पराभवाचा धक्का दिला होता.
तत्पूर्वी, 17 वर्षीय उन्नतीने सुरुवात आश्वासक खेळ केला. पण हा जोम तिला पुढे टिकविता आला नाही. जपानची अग्रमानांकित व जागतिक आठवी मानांकित तोमोका मियाझाकीने तिला 43 मिनिटांच्या खेळात 21-19, 21-11 असे हरविले.









