भारतीय बनावटीचे ड्रोन ठरले ‘गेम चेंजर’, सुरक्षा दलाकडे मुबलक दारूगोळाही उपलब्ध
कारगिल युद्धातून धडा घेतल्यानंतर आपण शस्त्रास्त्रs आणि दारुगोळ्यामध्ये स्वावलंबी होण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ची कास धरली. त्याचा फार मोठा फायदा पाकिस्तानवरील आताच्या लष्करी कारवाईत होत असल्याचे दिसून येत आहे. प्रसिद्ध युद्ध शास्त्र अभ्यासक, निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी ही माहिती दिली. मेक इन इंडियातून तयार झालेले ड्रोन या कारवाईत ‘गेम चेंजर’ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आपण देशात ‘मेक इन इंडिया’ हा प्रोग्रॅम गेल्या दहा वर्षांपासून राबवत आहोत. या ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आपण शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होत आहोत. आतापर्यंत जी शस्त्रs आपण इतर देशांकडून घेत होतो आणि त्याच्या किमतीही जास्त होत्या. मेक इन इंडियाच्या माध्यमातून त्यापेक्षा कमी किमतीमध्ये आपण शस्त्रास्त्र तयार करीत आहोत. कारगिल युद्धावेळी ज्यावेळी शस्त्र साठ्यावर परिणाम झाला, त्यावेळी आपल्याला तिप्पट किमतीने शस्त्रास्त्रs घ्यावी लागली होती. मात्र, आता असा कोणताही प्रसंग येणार नाही. कारण आपण शस्त्रास्त्र निर्मितीची चेन सिस्टीम यशस्वीरीत्या पूर्ण करीत आहोत. पूर्वी जवळपास 30 टक्के शस्त्रास्त्रs आपण परदेशांतून आणत होतो. पण आता आपण सर्व शस्त्रास्त्र बनविण्यासोबतच शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्यातही करतो. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्मिती केल्यामुळे शस्त्रास्त्र निर्मितीवरील खर्चही कमी होतो, असे श्री. महाजन यांनी सांगितले. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आपला लॉजिस्टिक
स्टॅमिना वाढला आहे. आपण जास्त काळ युद्ध करू शकतो, बहुआयामी युद्ध करू शकतो. आपल्याकडे ड्रोन बनविण्यासोबतच ‘वॉच स्टॅमिना’ही वाढविलेला आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हलाल पद्धतीचा वापर करून पाकिस्तानची युद्ध क्षमता कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लहान कमी किमतीचे शस्त्र वापर, योग्य ठिकाणी वापर करून आपण योग्य लक्ष्य साध्य करीत आहोत. लहान शस्त्राचा वापर करून आपण लक्ष्य साध्य करीत असताना, एक हजार कोटीचे मिसाईल डागून एक बिल्डिंग उद्ध्वस्त होत असेल तर फायदा काय? म्हणून आपण योग्य पद्धतीने कार्यवाही करीत आहोत.
आजच्या घडीला आपण ‘ऑल आऊट वॉर’ पद्धतीने कार्यवाही करीत आहोत. यात आपण युद्धाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवत पारंपरिक पद्धतीने पुढे जात आहोत. तसेच ठिकठिकाणी युद्ध सुरू करून शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एकाचवेळी पंजाबमधून असेल, वाळवंटातून असेल वा अन्य ठिकाणाहून असेल, आपण योग्य युद्धनीतीचा वापर करून आपण पाकिस्तानचे नुकसान करीत आहोत. मात्र यासाठी कोणत्या वेळी कोणती शस्त्र वापरायची हे सर्व त्या-त्या परिस्थितीनुसार आपलं सैन्यदल ठरवत असतं, असे ते म्हणाले.
आणखी एक गोष्ट म्हणजे आपण कोणत्या देशाच्या दबावाखाली नाही किंवा दबाव घेत नाही. आज ज्यावेळी आपल्यावर दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी त्यांनी कोणत्या देशाला मग तो सौदी अरेबिया असेल अमेरिका असेल व अन्य कुणाला विचारलं होतं का? मग आम्ही प्रतिहल्ला करताना त्यांना का विचारावे? आम्ही त्यांना मारणारच! आम्ही आमच्या राष्ट्राचे रक्षण करतोय आणि अशा पद्धतीने राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी स्ट्राँग लीडरशिप आपल्याला मिळालेली आहे, त्याचे कौतुक करायला हवे. आम्हाला अमेरिकेशी शत्रुत्व नको आहे म्हणून आम्ही अमेरिकेलाही सांगितले आहे, आम्ही तुमचे मित्र आहोत पण राष्ट्ररक्षणाचा हक्क आम्हाला आहे. दुसरीकडे चीन आपल्या विरोधात असून याबाबत आपण त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार, व्यापार कमी करणे अशा गोष्टींची कार्यवाही करायला हवी, असे ते म्हणाले.
सर्वांना आणखी एक सांगायचं आहे की, आपण आज जिथे काम करतोय तिथेच काम करा. क्रिकेटच्या कॉमेंट्रीप्रमाणे टीव्हीसमोर बसून हल्ल्यांच्या बातम्या ऐकत राहू नका. आपली अर्थव्यवस्था सुरू राहील, अशा पद्धतीने आपले काम सुरू ठेवा. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. काही ठिकाणी चुकीची भडकाऊ माहिती दिली जाते. त्याबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांना त्या लिंक पाठवा, असे आवाहनही निवृत्त ब्रिगेडियर महाजन यांनी केले आहे.









