कोल्हापूर :
भारत–पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुढे जाऊन जर आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झाली. त्यात कोणत्याही प्रकारची मदत लागली तर कोल्हापूरकर प्रशासनाच्या सोबत असतील, अशी ग्वाही खासदार शाहू महाराज यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना गुरुवारी दिली.
पहलगाममध्ये पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याने भारताने सीमेलगत असणाऱ्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानकडूनही हल्ले होत आहे. सध्या भारत–पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शाहू छत्रपती यांनी निवृत्त सैनिकी अधिकारी, स्वंयसेवी संस्था, उद्योजक आदींच्या शिष्टमंडळासवेत गुरूवारी जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेतली.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, कोणत्याही आपत्तकालीन परिस्थित आली तर मदतीला धावून जाण्याचा कोल्हापूरचा इतिहास आहे. महापूरावेळी हे दिसूनही आले आहे. कोल्हापूर जिह्यात सैन्य दलात विविध पदावर काम केलेल्या लष्करी अधिकारी आणि जवानांचीही संख्या मोठी आहे. त्यांचा अनुभवही मोठा आहे. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास कोल्हापूरकर अग्रभागी असतील.
केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाला सध्याच्या स्थिती संदर्भात काही सूचना दिल्या आहेत का? याबाबत विचारणा केली. कोल्हापूर हे संवेदनशिल जिह्यांमध्ये येत नसल्याने येथे मॉकड्रील झालेले नाही. सध्या कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. संस्थांत्मक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता भासली तर जिह्यातील अनेक संस्था, संघटना तयार आहेत. त्याबाबतची माहिती संकलित करून ती राज्य शासनाला सादर करावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. जनरल अजिम सय्यद (निवृत्त), उद्योजक सतिश घाडगे, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, हॉटेल मालक संघाचे उज्वल नागेशकर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, डॉ. शितल देसाई, बाळ पाटणकर, नंदकुमार बामणे, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते.
- आता सर्वच अड्डे उद्धवस्थ करा
भारताचे लष्करी सामर्थ्य मजबूतच आहे. भारताने पाकिस्तानचे नऊ दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले आहेत. आजही ड्रोन हल्ले केले. त्यामुळे आता उरले सुरले सर्वच अड्डे उद्धवस्त करून टाकावेत, असे मतही खासदार शाहू छत्रपतींनी व्यक्त केले आहे. यावेळी 100 दिवस कृती कार्यक्रमात राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हाधिकारी येडगे यांचा सत्कार करण्यात आला.








