किनारपट्टी, जलाशये, विमानतळांवरील सुरक्षेत वाढ : गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांची माहिती
बेंगळूर : काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केल्याचा प्रतिकार म्हणून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. दहशतवादी हल्ल्यांच्या संभाव्य धोक्यांमुळे संपूर्ण देश हाय अलर्टवर आहे. दरम्यान, राज्यातही हाय अलर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व 17 जलाशय, औद्योगिक वसाहती, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी गुरुवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सुरक्षा व्यवस्थेविषयी माहिती दिली. दहशतवादी हल्ल्यांच्या धोक्यांमुळे कर्नाटकातही सतर्कता बाळगण्यात आली आहे. किनारपट्टी भाग आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागांसह सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यात काही स्लीपर सेल सक्रिय सक्रिय झाले आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिक दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्वत्र खबरदारी बाळगली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहेत. कारवार जिल्ह्यातील कैगा अणुऊर्जा केंद्र, रायचूरच्या शक्तिनगर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, मंड्या जिल्ह्यातील कृष्णराजसागर जलाशय यासह इतर ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. म्हैसूरमधील कृष्णराजसागर, गोरुर येथील हेमावती, बागलकोट जिल्ह्यातील आलमट्टी, तुंगभद्रा, मलप्रभा, वाणीविलाससह राज्यातील सर्व जलाशयांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. बेंगळूरमधील डीआरडीओ, एचएएलसह संरक्षण संशोधन संस्था, विमानतळ, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने विमानतळांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
सर्वत्र सतर्कता : सिद्धरामय्या
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अ•s भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्यात सर्वत्र सुरक्षा सराव सुरू आहे. मंड्या जिल्ह्यातील गज्जलगेरे येथे हेलिपॅडवर पत्रकारांशी ते बोलत होते. जलाशयांच्या सुरक्षिततेबाबत सर्वत्र इशारे देण्यात आले आहेत. आपत्कालिन परिस्थित खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसंबंधी केंद्र सरकारच्या सर्व सूचनांचे पालन केले जात आहे.
बहुतांश पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविले!
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्यात आले आहे. बहुतांश पाकिस्तानी नागरिक निघून गेले आहेत. म्हैसूरमधील काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ते वगळता इतरांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे.









