कर्रेगुट्टा येथे कारवाई : 15 दिवसांच्या चढाईनंतर सैन्य नक्षली अड्ड्यार दाखल
वृत्तसंस्था/ जगदलपूर
छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये सुरक्षा दलांनी 22 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. सर्व मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिह्यात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी 22 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. 21 एप्रिल रोजी जिह्यातील कर्रेगुट्टा टेकड्या आणि छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर असलेल्या टेकड्यांमध्ये ‘मिशन संकल्प’ नावाची एक मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये सुमारे 24 हजार सैनिक सहभागी झाले होते. 24 एप्रिल रोजी तीन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर बिजापूर जिह्याच्या नैर्त्रुत्य सीमावर्ती भागातील जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांना नक्षलविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आले.
बस्तर प्रदेशात सुरू केलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाईंपैकी एक असलेल्या या मोहिमेत जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि छत्तीसगड पोलिसांचे एसटीएफ, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) यासह विविध तुकड्यांचे सैनिक सहभागी होते.
बिजापूर (छत्तीसगड) आणि मुलुगु व भद्राद्री-कोठागुडेम (तेलंगणा) दरम्यानच्या आंतरराज्य सीमेच्या दोन्ही बाजूंना सुमारे 800 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या खडकाळ भूभागात आणि घनदाट जंगलात ही कारवाई सुरू होती. हे ठिकाण छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून 450 किलोमीटर अंतरावर आहे.









