हिरेबागेवाडीनजीक वाहनांची टक्कर : दोन कारमधील दोघे जखमी
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन कारची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात हिरेबागेवाडी येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी जखमी झाली आहे. दुसऱ्या कारमधील सौंदत्तीचे माजी आमदार आर. व्ही. पाटील यांचा मुलगा जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडीनजीक हा अपघात घडला असून या अपघाताची नोंद बैलहोंगल पोलीस स्थानकात झाली आहे. अनिस सय्यद (वय 25), पत्नी उमे अवमन (वय 24), मुलगा अहमद (वय 1 वर्षे) अशी अपघातातील मृतांची नावे असून आयेशा (वय 18) असे जखमी मुलीचे नाव आहे. हे सर्वजण हिरेबागेवाडी गावचे राहणारे आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, अनिस हे आपल्या पत्नी व मुलांसह गोकाक येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न समारंभ उरकून आपल्या आल्टो कारमधून बेळगाव-बैलहोंगल राज्य महामार्गावरून गावाकडे येण्यासाठी निघाले होते. तर बेळगावहून बैलहोंगलकडे किया कारमधून सौंदत्तीचे माजी आमदार आर. व्ही. पाटील यांचा मुलगा भरधाव वेगाने निघाला होता. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना किया कारने समोरून येणाऱ्या अल्टो कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पती-पत्नी व मुलगा जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने अक्षरश: चक्काचूर झाली आहेत.
अपघात घडताच किया कारमधील एअरबॅग उघडल्याने माजी आमदार आर. व्ही. पाटील यांचा मुलगा सुदैवाने बचावला. अपघाताची माहिती समजताच बैलहोंगल पोलीस स्थानकाचे निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमींना रुग्णालयात हलविण्यासह मृतदेह शवागारात हलविण्याचे काम सुरू होते. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी बैलहोंगल पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. हिरेबागेवाडी गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असतानाच काळाने घाला घातल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे हिरेबागेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









