मार्च महिन्यात 8 हजार 776 प्रवाशांचा विमानप्रवास : दुसऱ्या क्रमांकावर राजधानी बेंगळूर : तिसऱ्या स्थानी हैद्राबाद
बेळगाव : देशाची राजधानी दिल्ली या शहराला बेळगावच्या हवाई प्रवाशांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. मार्च महिन्यात तब्बल 8 हजार 776 प्रवाशांनी विमान प्रवास करत उच्चांक गाठला. सध्या बेंगळूर, हैद्राबाद, मुंबईपेक्षाही अधिक प्रवासी दिल्लीला प्रवास करत आहेत. प्रशासकीय अधिकारी तसेच लष्करी जवान यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे रेजिमेंटल सेंटर आहे. त्याचबरोबर सांबरा येथे एअरमन ट्रेनिंग स्कूल, कोब्रा ट्रेनिंग स्कूल, महार रेजिमेंटचे कार्यालय बेळगावमध्ये आहे. त्यामुळे लष्करी जवान व त्यांचे अधिकारी यांची दिल्ली येथून बेळगावला ये-जा असते. तसेच उत्तर भारतात कुठेही जाण्यासाठी दिल्ली येथून कनेक्टिंग फ्लाईट उपलब्ध असल्यामुळे बेळगाव-दिल्ली प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
केवळ बेळगावच नाही तर जवळील कोल्हापूर, सांगली, हुबळी व कोकणातील प्रवासी दिल्लीला जाण्यासाठी बेळगाव विमानतळाला पसंती देतात. दिल्लीपाठोपाठ बेंगळूर शहराला प्रवाशांची पसंती आहे. मार्च महिन्यात 7 हजार 816 प्रवाशांनी वाहतूक केली आहे. सध्या बेळगावमधून दररोज दोन तर आठवड्यातून तीन अशा विमानफेऱ्या उपलब्ध असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. बेंगळूर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून बेळगावला सुवर्णसौध असल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची सर्वाधिक ये-जा असते. यापाठोपाठ बेळगाव-हैद्राबाद या दरम्यान 4 हजार 56 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. तर बेळगाव-मुंबई मार्गावर 2 हजार 432 प्रवाशांनी प्रवास केला आहे. बेळगाव-मुंबई दरम्यान लहान विमान सेवा देत असल्याने प्रवाशांची संख्या वाढलेली दिसून येत नाही. त्यानंतर जयपूर शहराला 1 हजार 175 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.









