प्रतिनिधी / बेळगाव
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही निवडक गड-किल्ल्यांचा प्रतिकृती साकारून उभारण्यात आलेल्या मिलिटरी महादेव परिसरातील तमाम शिवप्रेमींचे प्रेरणास्थान असलेल्या शिवतीर्थाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने हाती घेतले आहे. संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली पूर्ण झाले.
शिवतीर्थासाठी मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरने जागा उपलब्ध करून दिली आहे. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी आणि एमएलआरसीच्या इतर अधिकाऱ्यांचे यासाठी सहकार्य लाभले.
या नूतनीकरणाच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे रंगकाम, मूर्तीला ग्रानाईटचा चौथरा, मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी स्टेनलेस स्टीलचे पोल्स आणि साखळी, 13 गड-किल्ल्यांचे नूतनीकरण व रंगरगोटी तसेच प्रत्येक किल्ल्याची संक्षिप्त माहिती देणारे फलक, लॉन, शोभेच्या झाडांचे वृक्षारोपण, पूर्ण परिसरात हाईमॅक्स लाईट्सची व्यवस्था आणि परिसरात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा भिडाची बाकडीही बसविण्यात आली आहेत. हे अतिशय देखणे शिवतीर्थ लवकरच शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.









