वार्ताहर/ किणये
पिरनवाडी येथे एकाच रात्रीत दोन दुकानांना आग लागली. या आगीत बुक स्टॉल व स्टेशनरी दुकान जळून खाक झाले. ही आग शुक्रवारी मध्यरात्री लागली असून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दुकान मालक व स्थानिक नागरिकांनी दिली.
पिरनवाडी मुख्य रस्त्याच्या बाजूला पवन बाबू पाटील यांचे बुक स्टॉल व स्टेशनरी दुकान अशी दोन दुकाने आजूबाजूला लागून आहेत. या दुकानांना शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत बुक स्टॉलमधील वह्या, पेन्स, फाईल्स व फर्निचर जळून खाक झाले. तसेच स्टेशनरी दुकानामधील विविध प्रकारचे स्टेशनरी प्रॉडक्ट, कॉस्मेटिक, टेलरिंगचे मटेरियल व फर्निचर जळाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही आग लागल्याने बाजूलाच असणाऱ्या काही नागरिकांना धूर आल्याचे जाणवले. त्यांनी लागलीच सदर दुकान मालकांना याबाबतची माहिती दिली. दोन्ही दुकाने पेटत असतानाचे पाहून दुकान मालक हतबल झाले होते.
अग्निशमन दलाचे वाहन पहाटे 4:15 च्या दरम्यान दाखल झाले. त्यानंतर आग विझविली. मात्र तोपर्यंत या आगीत दोन्ही दुकानांतील साहित्य जळून खाक झाले होते. बुक स्टॉल आणि स्टेशनरी दुकान या दोन्ही दुकानांमध्ये पवन पाटील यांचा दैनंदिन व्यवहार चालू होता. मात्र दोन्ही दुकाने आगीत भस्मसात झाल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोठे नुकसान
पवन पाटील यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांचे पिरनवाडी येथे स्टेशनरी दुकान आहे. या दुकानाला अचानक आग लागून सुमारे 4 लाख रुपये किमतीचे बुक्स, पेन आदी स्टेशनरी सामान, 1 लाख रुपये किमतीचे टेलरिंग साहित्य, 2 लाख रुपये किमतीची कॉस्मेटिक्स, 3 लाख रुपये किमतीचे फर्निचर, सुमारे 35 हजार रुपये किमतीचे शटर आगीत जळून खाक झाले आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.









