दहावीचा 62.16 टक्के निकाल : बैलहोंगलची विद्यार्थिनी राज्यात प्रथम, सेंट जोसेफ हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनी द्वितीय स्थानी
बेळगाव : मागील महिन्याभरापासून असलेली दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर शुक्रवारी संपली. एसएसएलसी परीक्षेचा निकाल दुपारी 12 नंतर परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 62.16 टक्के इतका लागला आहे. यावर्षी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याला मागे सारत बेळगावने राज्यात 25 वे स्थान मिळविले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निकालात थोड्या प्रमाणात सुधारणा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 31,771 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 19,584 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 7861 मुले व 11,723 मुलींचा समावेश आहे. मागीलवर्षी बेळगाव शहर विभाग सर्वात पुढे होता. परंतु यावर्षी कित्तूर तालुका बेळगाव शहरापेक्षा सरस ठरला. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनी उत्तीर्ण होण्याची संख्या यावर्षी अधिक असल्याचे दिसून आले.
मागीलवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्हा राज्यात 29 व्या स्थानी होता. यावर्षी तो 25 व्या स्थानावर पोहोचला आहे. बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याला मागे सारत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याने टक्केवारीत आघाडी घेतली. बैलहोंगल तालुक्यातील देवलापूर गावची विद्यार्थिनी रुपा पाटील हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यापाठोपाठ बेळगावमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी निलांबिका बुबनाळे व निधी नंदकुमार कंग्राळकर यांनी 624 गुण घेऊन राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविले. खानापूरच्या नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा मेमोरियल रेसिडेन्शीयल स्कूलची विद्यार्थिनी रोहिणी पाटोळे हिने देखील 624 गुण मिळविले आहेत. महिला विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी अन्विता तलगेरी 623 गुण, बैलहोंगल येथील संस्कृती बिरादार 623 गुण, बैलहोंगल येथील पद्मावती निज्रड 623 गुण, केएलएस इंग्लिश मीडियम शाळेची विद्यार्थिनी समृद्धी मुल्या हिने 623 गुण घेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.
शेतकऱ्याची मुलगी राज्यात प्रथम : रुपा पाटील हिला 625 पैकी 625 गुण, डॉक्टर होण्याची इच्छा
दहावी परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील देवलापूर येथील सरकारी शाळेची विद्यार्थिनी रुपा चनगौडा पाटील या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तिने सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. एका शेतकरी घरातील सरकारी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला आणि बेळगाव जिल्ह्यातील रुपा पाटील ही राज्यात प्रथम आल्याचे परीक्षा मंडळाने जाहीर केले. राज्यातील एकूण 22 विद्यार्थ्यांना 625 पैकी 625 गुण मिळाले आहेत. त्यामध्ये रुपा पाटील हिचा समावेश आहे. ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी रुपा आपल्या आजीच्या गावी हावेरी येथील शिग्गाव येथे होती. आपल्या आजीसोबत तिने आनंद साजरा केला. रुपाचे वडील चनगौडा हे शेतकरी असून आई लता या गृहिणी आहेत. वडिलांनी आयटीआयपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून आई पीयुसीपर्यंत शिकली आहे. तिची मोठी बहीण वैष्णवीने पीयुसी विज्ञान विभागात 90 टक्के गुण पटकाविले आहेत. आई-वडिलांनी स्वातंत्र्य दिल्यामुळे पूर्णपणे अभ्यास करणे शक्य झाले. भविष्यात डॉक्टर होण्याचे ध्येय तिने माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.










