शहरवासियांची चिंता काहीशी दूर : पाणी जपून वापरण्याचे आवाहन : पावसाला उशिरा प्रारंभ झाल्यास येणार अडचणी
बेळगाव : हिडकल आणि राकसकोप जलाशयातून शहराला दररोज 110 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यापैकी हिडकलमधून 65 एमएलडी तर उर्वरित राकसकोपमधून 45 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. सद्यस्थितीत हिडकल जलाशयातूनच शहराला अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या जलाशयावरच पाण्याचा भार वाढला आहे. शिवाय खबरदारी म्हणून राकसकोप जलाशयातील पाणी राखून ठेवले जात आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही जलाशयांची पाणीपातळी टिकून आहे. मात्र, हिडकल जलाशयावर बेळगाव व हुक्केरी आणि संकेश्वर शहराचा भार आहे. त्यातच सध्या हिडकल जलाशयातूनच अतिरिक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरवासियांची चिंता काहीशी दूर झाली.
हिडकल जलाशयात सद्यस्थितीत 15.24 टीएमसी पाणी
हिडकल जलाशयात सद्यस्थितीत 15.24 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी ते 14.65 टीएमसी होते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा 0.59 टीएमसी पाणी अधिक आहे. हिडकल जलाशयात मेच्या प्रारंभी गतवर्षी 2118.07 फूट पाणीसाठा होता. यंदा 2120.13 फूट पाणी शिल्लक आहे. राकसकोप जलाशयात गतवर्षी मे महिन्याच्या प्रारंभी 2457.03 फूट तर यंदा 2457.55 फूट पाण्याची पातळी आहे. त्यामुळे दोन्ही जलाशयात पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे शहरवासियांची चिंता काहीशी दूर झाली आहे.
राकसकोप जलशयाचा अतिरिक्त विसर्ग मार्कंडेयमध्ये
गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे दोन्ही जलाशये पूर्ण क्षमतेने भरली होती. राकसकोप जलाशयातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीमध्ये करण्यात आला होता. दोनवेळा अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यात आले होते. शिवाय अधूनमधून वळिवाचा पाऊस जलाशय परिसरात होत आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत राकसकोप जलाशयाची पातळी टिकून आहे. त्यामुळे मे महिनाअखेरपर्यंत पाण्याची चिंता जाणवणार नाही, असा दावाही एलअँडटीने केला आहे. मात्र, पावसाला उशिराने प्रारंभ झाल्यास अडचणी येणार आहेत. गतवर्षी उन्हाळ्यात जलाशयांची पाणीपातळी मोठ्याप्रमाणात खालावली होती. शिवाय मान्सूननेही उशिराने साथ दिली. त्यामुळे जून महिन्यात मृतसाठ्यातील पाण्याचा उपसा करण्याची वेळ आली होती. त्या तुलनेत हिडकल व राकसकोप जलाशयात समाधानकारक पाणी असल्याचे एल अँड टी ने सांगितले आहे.
नागरिकांनी पाणी बचत करून सहकार्य करावे
गतवर्षीपेक्षा यंदा हिडकल आणि राकसकोप जलाशयाची पाणीपातळी टिकून आहे. शिवाय खबरदारी म्हणून राकसकोप जलाशयातील पाणी टिकवून ठेवले जात आहे. नागरिकांनी पाणी बचत करून सहकार्य करावे. शहरात सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी एल अँड टी प्रयत्न करत आहे.
– धीरज उभयकर (एलअँडटी मॅनेजर)









