खासदार जगदीश शेट्टर यांची उपस्थिती, एकूण 135 केएलडी क्षमतेचा प्रकल्प : दोन प्रकल्पांचे उद्घाटन
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते करण्यात आले. अशोक आर्यन कंपनीच्या जय भारत फौंडेशन व रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 100 केएलडी व 35 केएलडी अशा दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. हे पाणी आता इतर कामांसाठी वापरले जाणार आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वर्षभरापूर्वी फिश मार्केट व कॅन्टोन्मेंट क्वॉर्टर्सजवळ भूमिपूजन करण्यात आले होते. यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होते. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतर कामांसाठी वापरले जाणार आहे. फिश मार्केट येथे 100 केएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तर कॅन्टोन्मेंट क्वॉर्टर्स येथे 95 केएलडी क्षमतेचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभा राहिला.
समाजोपयोगी प्रकल्प सुरू ठेवण्याचे आवाहन
प्रक्रिया झालेले पाणी स्वच्छतेसोबतच बागेसाठी वापरता येणार आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील पाणी याठिकाणी जमा करून त्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रकल्पाबद्दल रोटरी व कॅन्टोन्मेंटचे कौतुक केले. तसेच समाजोपयोगी प्रकल्प यापुढेही सुरू ठेवावेत, असे आवाहन केले. यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, प्रांतपाल शरद पै, कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार, अशोक आयर्नचे जयंत हुंबरवाडी, कॅन्टोन्मेंटचे अभियंता सतीश मण्णूरकर, अध्यक्ष सुहास चिंडक, माजी अध्यक्ष जियदीप सिद्धण्णवर, पुष्पा पर्वतराव, मिलिंद पाटणकर, अशोक परांजपे, योगेश कुलकर्णी, पराग भंडारे यासह रोटरीचे इतर सदस्य उपस्थित होते.









