वाहनधारकांना चिंता, कामाला गती देण्याची मागणी : रस्त्याचे चौपदरीकरण-डांबरीकरण
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्गावरील हिंडलगा ते सुळगा दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी होणार का, असा प्रश्न पडू लागला आहे. चार महिन्यापूर्वी रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून देखील काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांतून चिंता व्यक्त होत आहे. कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. बेळगाव-वेंगुर्ला हा महत्त्वाचा दोन राज्यांना जोडणारा राज्यमार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर अलिकडे वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्या तुलनेत हा मार्ग कमी पडू लागला आहे. परिणामी अपघातांची संख्या वाढली आहे. विशेषत: मिलिटरी विनायक मंदिर ते बाची सीमाहद्दीपर्यंत रस्त्याची दुदर्शा झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात
परिस्थिती आणखीच बिकट बनणार आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील हिंडलगा ते सुळगा दरम्यान चौपदरीकरणासाठी 7 कोटी रुपयांचा निधी खर्ची घातला जाणार आहे. रस्त्याचे आरेखन करून झाडे हटविण्याबरोबर गटारी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कामाला म्हणावी तशी गती नसल्याने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील कर्नाटक हद्दीतील गांधी स्मारक ते बाची दरम्यान रस्त्याचे नुतनीकरण होणे आवश्यक आहे. सध्या गांधी स्मारक ते मिलिटरी विनायक मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले आहे. शिवाय हिंडलगा ते सुळगा दरम्यान रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर सुळगा गावापासून ते बाची सीमाहद्दीपर्यंत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे.
म. ए. समितीचे आंदोलन
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील सीमाहद्दीतील रस्त्यासाठी म. ए. समितीने वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले आहे. त्यामुळे रस्ता कामाला चालना मिळाली आहे. पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. म. ए. समितीच्या आंदोलनानंतर तात्पुरती खडी टाकून मार्ग सुरळीत करण्यात आला होता. आता रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असली काम संथगतीने सुरू असल्याने म. ए. समितीतून संताप व्यक्त होत आहे. पावसाळा केवळ महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वाहनधारकांची अडचण लक्षात घेऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. या मार्गावर पश्चिम भागासह चंदगड आणि कोकणातील वाहनांची संख्या मोठी आहे. कोकणातून बेळगाव भागात येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील परिवहन मंडळाच्या बसेस धावतात. मात्र रस्त्याच्या कामाला म्हणावी तशी गती मिळत नसल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील वाहनधारकांना यंदाच्या पावसाळ्यातही धक्के खातच प्रवास करावा लागणार का, असा प्रश्न पडला आहे.
गटारीचे पाणी केंबाळी नाल्यात सोडा
हिंडलगा ते सुळगा रस्त्याशेजारी खोदण्यात येत असलेल्या गटारीचे पाणी केंबाळी नाल्याकडे वळविणे आवश्यक आहे. पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी गटारीचे पाणी केंबाळी नाल्यात सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
वेळेत काम पूर्ण करण्यासाठी धडपड
हिंडलगा ते सुळगा दरम्यानच्या मार्गावरील अडथळा ठरणारी झाडे हटविली जात आहेत. शिवाय एका बाजूने गटारीसाठी खोदाई केली जात आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, त्यानंतर सुळगा ते बाची सीमाहद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.
– शशिकांत कोलेकर (पीडब्लूडी असिस्टंट एक्झिक्युटीव्ह इंजिनियर)









