खासदार जगदीश शेट्टर यांना कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांतर्फे निवेदन
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा एप्रिल 2026 मध्ये भरविण्यात येणार असल्यामुळे यात्रेपूर्वी गावातील विविध विकासकामे पूर्ण करून ग्रामस्थांना दिलासा देण्याच्या आशयाचे निवेदन शुक्रवारी देवस्थान पंचकमिटी, ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खासदार जगदीश शेट्टर यांना देण्यात आले. जवळ जवळ 42 वर्षांनी ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा एप्रिल 2026 मध्ये भरविण्याचे ठरल्यामुळे गावातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करणे गरजेचे आहे. यामध्ये कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगरपर्यंतच्या रस्त्यांचे सीडीपी नकाशाप्रमाणे पक्के डांबरीकरण करणे, आझमनगर, शाहूनगरमधील महानगरपालिकेच्या 34 नगरांचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतवाडीतून शेतकऱ्यांनीच तयार केलेल्या कच्च्या गटारीतून वाहून नाल्याला मिळत असते.
तेव्हा या गटारीचे पक्के काँक्रीटीकरण करून गटारी तयार करणे, गावाजवळच्या तलावाच्या बाजूने गावच्या पश्चिमेकडील कच्च्या कालव्यातून संपूर्ण गावचे सांडपाणी वाहत असते. तेव्हा हे न होण्यासाठी मार्कंडेय नदीपर्यंत पक्के काँक्रीटीकरण गटार तयार करणे, गावामध्ये एकूण 9 वॉर्ड आहेत. या सर्व वॉर्डातील नागरी समस्या रस्ते, गटारी पूर्ण करणे, जलनिर्मल योजना काम पूर्ण करून नागरिकांना 24 तास नळांना पाणी सोडून नागरिकांना दररोज ताजे पाणी मिळण्याची व्यवस्था करणे, तसेच गावातील सर्व वॉर्डातील इतर शिल्लक राहिलेल्या नागरी समस्या पूर्ण करून गावचे नंदनवन करण्यासाठी मोठा निधी मंजूर करून श्री लक्ष्मी यात्रेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची मागणी निवेदनामध्ये केली आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी निवेदनाचा स्विकार करून सर्व नागरी समस्या पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी देवस्थान पंचकमिटीचे सदस्य, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.









