वृत्तसंस्था/ बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात आज शनिवारी लढत रंगणार असून आरसीबीला प्ले-ऑफमध्ये तात्पुरती जागा मिळण्याची शक्यता समोर दिसू लागली आहे, तर चेन्नई सुपर किंग्सला मनोबल उंचावणाऱ्या विजयाची आवश्यकता आहे. परंतु सांघिक लक्ष्यांच्या पलीकडे या सामन्यात विराट कोहली आणि एम. एस. धोनी एकमेकांविऊद्ध उभे ठाकणार असून कदाचित आयपीएलमध्ये असे चित्र पाहायला मिळण्याची ही शेवटची खेप असू शकते.
परिस्थितीवर एक नजर टाकल्यास असे दिसून येईल की, आरसीबी या सामन्यातील विजयासह त्यांची गुणसंख्या 16 पर्यंत वाढवू शकते. तसे झाल्यास तीन सामने शिल्लक असताना पात्रता फेरीच्या शर्यतीत ते डगमगणार नाहीत. आधीच बाहेर पडलेल्या ‘सीएसके’ संघाला विजय मिळाल्यास तो गुणतालिकेच्या तळाशी विसावण्याची नामुष्की टाळून ते मध्यभागी पोहोचू शकतात असा आत्मविश्वास निर्माण करून जाऊ शकेल. कोहली आणि धोनी चिन्नास्वामी स्टेडियमवर एकमेकांविऊद्ध पूर्ण क्षमतेने झुंज देतील. कोहलीने गेल्या पाच डावात चार अर्धशतके झळकावून आणि 443 धावा करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले आहे.
कोहली ‘आरसीबी’ला प्ले-ऑफमधील स्थानाच्या जवळ पोहोचण्यास मदत करण्याच्या दृष्टीने आणखी एक छोटासा मास्टरक्लास सादर करण्यास उत्सुक असेल. देवदत्त पडिक्कलने त्याच्या मागील दोन डावात दोन अर्धशतके फटकावून तिसऱ्या क्रमांकावर त्याला भक्कम पाठिंबा दिलेला आहे. परंतु कोहलीला त्याचा सलामीचा जोडीदार फिल सॉल्टकडून अधिक योगदानाची अपेक्षा असेल, जेणेकरून त्याला एकट्यालाच भार उचलावा लागणार नाही. त्याचप्रमाणे आरसीबी कर्णधार रजत पाटीदारही फॉर्म परत मिळवण्यास उत्सुक असेल. कारण त्याची शेवटची महत्त्वपूर्ण खेळी सात सामन्यांपूर्वी पाहायला मिळाली होती. तथापि, तो वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि फिरकी गोलंदाज नूर अहमद वगळता इतर कमी दर्जाच्या सीएसके गोलंदाजीचा फायदा घेण्याचा विचार करू शकतो.
पण या हंगामात सामूहिकरीत्या फॉर्ममध्ये घसरण झालेल्या सुपर किंग्सच्या फलंदाजांना जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा यांच्याविऊद्ध अशी संधी मिळणार नाही. संघाला आयुष म्हात्रे, सॅम करन, देवाल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबेसारखे फलंदाज धोनीचे काम डावाच्या शेवटी सोपे करतील, अशी आशा असेल. भूतकाळात धोनीच्या जलद 30 धावांनी चेन्नई सुपर किंग्सच्या मध्यम धावसंख्येचे रूपांतर स्पर्धात्मक धावसंख्येत केलेले आहे. परंतु वरच्या फळीच्या खराब कामगिरीमुळे या वर्षी कर्णधाराच्या नेहमीच्या कामगिरीचा प्रभाव कमी झाला आहे. परंतु चाहत्यांसाठी आज कोहली आणि धोनीची उपस्थिती त्यांनी एकत्रितपणे भारतीय संघाला मिळवून दिलेल्या अनेक विजयांच्या आठवणी जाग्या करेल.संघ-रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार) फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, लुंगी एनगिडी, लियाम लिव्हिंगस्टोन, स्वप्नील सिंग, मनोज भंडागे, रसिक दार सलाम, नुवान तुषारा, जेकब बेथेल, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग.
चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), शेख रशीद, आयुष म्हात्रे, दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथीराना, अंशुल कंबोज, आर. अश्विन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, श्रेयस गोपाल, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, सी. आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









