पाकिस्तानचे पंतप्रधानांचे युट्यूब अकाउंट भारतात ब्लॉक : चार क्रिकेटपटूंचे इन्स्टाग्राम अकाउंटही निलंबित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कारवाई करत आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अधिकृत यूट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले. याशिवाय क्रिकेटपटू बाबर आझम, हरिस रौफ, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदी यांचे इन्स्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. मोदी सरकारने पाकिस्तानातील अनेक न्यूज चॅनेल आणि यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहे. ‘राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सरकारी आदेशामुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही’ असा संदेश ब्लॉक केलेल्या चॅनेलवर दर्शविण्यात आला आहे.केंद्र सरकारने यापूर्वी भारताबद्दल खोटे, प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री प्रसारित केल्याबद्दल 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. तसेच पहलगाम हल्ल्यावरील बीबीसीच्या वृत्तांकनावरही तीव्र आक्षेप घेण्यात आला होता.









