गंगोत्री, यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले : हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
वृत्तसंस्था/ देहराडून
आगामी सहा महिने चालणाऱ्या चारधाम यात्रेला बुधवारपासून औपचारिक सुरुवात झाली. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी भाविकांसाठी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी गंगोत्री धाम गाठून येथे विशेष पूजा केली. पहिली पूजा पंतप्रधान मोदींच्या नावाने करण्यात आली. या सोहळ्याप्रसंगी हजारो भाविक गंगोत्रीला पोहोचले असून त्यांना रितसर दर्शन दिले जात आहे. तसेच यमुनोत्री येथेही तीन हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी पोहोचले आहेत.
गंगामातेची पालखी बुधवारी सकाळी सर्वप्रथम मुखाभा येथून गंगोत्री धामला पोहोचली. राजपुताना रायफल्स बँडच्या सुरात गंगेची पूजा करण्यात आली. हेलिकॉप्टरमधून मंदिरावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. गंगोत्रीनंतर सकाळी 11:55 वाजता यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. याआधी यमुनेची उत्सवी पालखी यमुनोत्री धाम येथे पोहोचली होती. पूजा झाल्यानंतर यमुनोत्रीचे दरवाजे उघडण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही गंगोत्री-यमुनोत्री धाम गाठून प्रार्थना केली. गंगोत्री-यमुनोत्रीनंतर आता केदारनाथचे दरवाजे 2 मे रोजी आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडले जातील.
चारधाम यात्रेबाबत प्रवाशांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी हरिद्वारच्या प्रवेशद्वारावरून यात्रेकरूंच्या तुकडीला रवाना करण्यात आले. पर्यटन राज्यमंत्री ओमप्रकाश जमदग्नी यांच्यासह संत आणि ऋषींच्या नेतृत्वाखाली मुंबईतील यात्रेकरूंना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी चारधाम यात्रेच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या. सुरळीत प्रवासासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर संशयास्पद लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी पडताळणी मोहिमा देखील सतत राबवल्या जात आहेत. भक्तांच्या सुरक्षेसाठी मार्गांवर आणि मंदिर परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.









