कोलकात्यातील दुर्घटना : 22 जणांना वाचविण्यात यश
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्यातील एका हॉटेलला मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत पंधरा जणांचा मृत्यू झाला. तसेच 13 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तसेच 22 जणांना वाचवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. अन्य 12 मृतांपैकी 8 पुरुषांची ओळख पटली आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर बसवलेल्या वीजमीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शहरातील ऋतुराज हॉटेलमध्ये रात्री 8:15 वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. आग झपाट्याने वाढत गेल्यामुळे अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या छतावरून आणि खिडक्यांमधून उड्या मारताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.









