2025-26 हंगामासाठी केंद्र सरकारकडून घोषणा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने 2025-26 साठी उसाचा रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) 355 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला आहे. ही बेंचमार्क किंमत असून यापेक्षा कमी किमतीत ऊस खरेदी करता येणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार समितीने 2025-26 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी 10.25 टक्के मूळ पुनर्प्राप्ती दरासाठी 355 रुपये प्रतिक्विंटल एफआरपी मंजूर केला आहे. यामध्ये 10.25 टक्केपेक्षा जास्त वसुलीत 0.1 टक्के वाढीप्रमाणे प्रतिक्विंटल 3.46 रुपये प्रीमियम दिला जाईल. तसेच, वसुलीत 0.1 टक्के कपात झाल्यास एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल 3.46 रुपये कपात केली जाईल.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने आगामी 2025-26 च्या साखर हंगामासाठी उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) 355 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करत मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाचा थेट फायदा देशभरातील सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी, त्यांच्या अवलंबितांना आणि साखर उद्योगाशी संबंधित सुमारे 5 लाख कामगारांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने अन्य काही महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत. 2025-26 हंगामासाठी उसाचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल 173 रुपये इतका अंदाजित करण्यात आला आहे. त्या तुलनेत प्रतिक्विंटल 355 रुपये एफआरपी जास्त असल्याचे सरकारचे मत आहे.
ही एफआरपी 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणाऱ्या साखर हंगामात लागू असेल. साहजिकच साखर कारखाने शेतकऱ्यांकडून या दराने ऊस खरेदी करतील. एफआरपी निश्चित करताना, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशी आणि राज्य सरकारे आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत विचारात घेण्यात आली. मागील हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना देय असलेल्या 1,11,782 कोटी रुपयांपैकी 1,11,703 कोटी रुपये (99.92 टक्के) अदा करण्यात आले आहेत. तसेच चालू हंगाम 2024-25 मध्ये 97,270 कोटी रुपयांपैकी 85,094 कोटी रुपये (87 टक्के) शेतकऱ्यांना दिल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली.
मेघालय-आसाम दरम्यान नवीन महामार्गाला मंजुरी
मेघालय आणि आसामला जोडणारा सिलचर ते शिलाँग आणि शिलाँग ते सिलचर या हायस्पीड कॉरिडॉर हायवेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा एक खूप मोठा प्रकल्प असून त्याची अंदाजे किंमत 22,864 कोटी रुपये आहे. नवीन महामार्ग 166.8 किमी लांबीचा असून तो चारपदरी असेल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.









