हाफिजचे गुप्त ठिकाण, लष्कर-ए-तोयबा मुख्यालय, मसूदचा टेरर कॅम्प, आसिम मुनीरच्या सैन्याचा तळ
नवी दिल्ल्ली
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या हल्ल्यावरून भारतीयांमध्ये आक्रोश असून भारत आणि पाकिस्तानचे संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले आहेत. भारताने दहशतवाद विरोधात कारवाई करणार असल्याचे जाहीर केल्याने पाकिस्तान हायअलर्ट मोडवर आहे.
पाकिस्तानवर भारताच्या संभाव्य सैन्य कारवाईवरून मागील दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. भारत पाकिस्तानच्या विरोधात मोठे पाऊल उचलू शकतो असे मानले जातेय आणि अशास्थितीत भारताच्या टार्गेट लिस्टमध्ये पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवादी म्होरक्यांचे अनेक तळ देखील आहेत. यातील पहिले नाव हाफिज सईदच आहे.
भारताच्या टार्गेट लिस्टमध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद असून तो 2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मानला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने देखील त्याला जागतिक दहशतवादी घोषित पेले आहे. हाफिज आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय निशाण्यावर असल्याचे मानले जात आहे. लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय पंजाब प्रांताच्या मुरिदके असल्याचे मानले जाते.
लाहोरमध्ये सईदच्या गुप्त ठिकाणाचा खुलासा झाला असल्याने पाकिस्तान विरोधातील स्वत:च्या सैन्य कारवाईत भारत सईदच्या गुप्त ठिकाणावर हल्ला करू शकतो असे मानले जातेय. हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तोयबाने भारताने अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.
मसूद अझहर अन् जैश-ए-मोहम्मदचा ट्रेनिंग कॅम्प
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर 2019 मधील पुलवामा हल्ल आणि अन्य दहशतवादी कारवायांचा सूत्रधार आहे. अझहरला देखील संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. पाकिस्तानच्या विरोधात सैन्य कारवाई करताना भारतीय सैन्य मसूद अझहर आणि त्याच्या जैश-ए-मोहम्मदच्या ट्रेनिंग कॅम्पला नष्ट करण्याची दाट शक्यता आहे. जैश-ए-मोहम्मदचे ट्रेनिंग कॅम्प मुख्यत्वे पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबच्या बहावलपूरमध्ये आहेत. पीओकेत रावलकोट आणि कोटली यासारख्या ठिकाणी जैशचे अनेक लाँच पॅड आणि ट्रेनिंग कॅम्प सक्रीय आहेत.
आसिम मुनीरचे सैन्य मुख्यालय
पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल आसिम मुनीर 2022 पासून या पदावर आहेत. त्यांचे नाव पुलवामा हल्ला आणि पहलगाम हल्ल्यासारख्या दहशतवादी हल्ल्यांशी जोडले गेले आहे, पुलवामा हल्ल्यावेळी मुनीर हे आयएसआयचे प्रमुख होते. पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय रावळपिंडीत असून हे पाकिस्तानचे सैन्य रणनीति आणि संचालनाचे केंद्र आहे. मुनीर यांनी एलईटी आणि जैश यासारख्या दहशतवाद्यांना पाठबळ पुरविले आहे. मुनीर हे युद्धाच्या भीतीपोटी रावळपिंडीत एका बंकरमध्ये लपून बसल्याचा दावा करण्यात येत आहे.
पीओकेतील दहशतवादी लाँच पॅड
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 17 ट्रेनिंग कॅम्प आणि 37 लाँचपॅड सक्रीय असून ते लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्द आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून संचालित केले जात आहेत. हे ट्रेनिंग कॅम्प भारतात घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना तयार करतात. हे लाँच पॅड प्रामुख्याने रावलकोट आणि कोटली यासारख्या क्षेत्रांमध्ये आहेत.
पाकिस्तानातील आयएसआय मुख्यालय
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय दहशतवादी संघटनांना बळ पुरविणे आणि भारताच्या विरोधात छुपे युद्ध राबविण्यासाठी कुख्यात आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जेश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांमागे आयएसआयच आहे. आयएसआयचे मुख्यालय इस्लामाबादमध्ये असून ते रणनीतिक आणि गुप्तचर घडामोडींचे केंद्र आहे.









