गायत्रीदेवींच्या पाठपुराव्यामुळे 52 कोटीचा निधी मंजूर.पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार.
औंध वार्ताहर
हजारो पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या औंध येथल येथील ऐतिहासिक श्रीभवानी वस्तू संग्रहालयाचे रूप आता बदलणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून औंध संस्थांच्या स्नुषा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.ग्रंथालय आणि श्री भवानी वस्तू संग्रहालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नुतनीकरणाकरीता 52 कोटी 66लाख 66 हजार 853 रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
औंध संस्थानचे कलाप्रेमी राजे भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधीं यांच्या दुरदृष्टीतून उभारलेल्या आणि अनेक कलातपस्वींच्या कुंचल्यातून साकारलेल्या अप्रतिम कलाकृतीचा नजराना डोळयात साठवण्यासाठी आजही लाखो पर्यटकांना औंधच्या वस्तुसंग्रहालयाची भुरळ पडत आहे.वस्तुचित्रसंग्रहालयात, अनमोल कलाकृतीचा, अमुल्य खजिना पाहण्यासाठी दरवर्षी राज्यासह देश विदेशातून अंदाजे दोन लाख पर्यटक भेट देतात.कलाप्रेमी राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी देश विदेशात फिरुन विविध पेंटिंग्ज, दुर्मिळ कलाकृती ,शिल्पवस्तू,विविध प्रकारची दुर्मिळ हत्यारे,चंदनी वस्तू गोळा करून 1937-38साली मूळपीठ डोंगराच्या मध्यावर श्रीभवानी वस्तू संग्रहालय उभारले तसेच१८ हजार विविध दुर्मिळ पुस्तके, ग्रंथ, हस्तलिखिते यांचा संग्रह करून त्याठिकाणी ग्रंथालय उभारणी केली आहे.
बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी उभारलेल्या संग्रहालयात जागेच्या अडचणीमुळे अनेक चित्रांना पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने काही कलाकृती अडगळीला पडल्या होत्या. मात्र संस्थानचा दैदिप्यमान वारसा जपण्यासाठी औंध संस्थानच्या स्नुषा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यानी पुढाकार घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्यामुळे संग्रहालयाची विस्तारित इमारत उभी राहिली आहे. तसेच अनेक कलाकृतीना पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे.








