प्रतिनिधी/ सातारा
निसर्ग नाही तर आम्ही नाही.विकासाच्या नावाखाली संवेदनशील क्षेत्र हटविले जात आहे. तोडली जाणारी झाडे टिकविणे गरजेजे आहे.निसर्ग हटवून कोणताही विकास नको असे दमयंतीराजे भोसले यांनी वाई येथे सांगितले. सुरुर वाई महाबळेश्वर पोलादपूर या रस्त्याच्या रुंदीकरणात सुमारे दोनशे वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन शेकडो जुने वृक्ष हटविले जाणार आहेत.याविरोधात वाई शहरातील वृक्ष प्रेमी एकवटले आहेत. ही निसर्ग संपदा हटवू नये या मागणीसाठी वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील पर्यावरणप्रेमींनी वाई शहरात कृतज्ञता फेरी( रॅली) काढली. या फेरीचे नेतृत्व दमयंतीराजे भोसले यांनी केले.या रॅलीत शेकडो कार्यकर्ते युवती महिला सहभागी झाले होते. या तिसऱ्या कृतज्ञता यात्रेची सांगता किसन वीर चौकात झाली.या वेळी त्या बोलत होत्या.
एव्हडी जुनी झाडे तोडून होणारा विकास आम्हाला नको. तिथे राहणारे पक्षी जीव जंतू आणि आमचा श्वास तोडला जात आहे.विकासाच्या नावाखाली निसर्ग भकास करून नव्याने कोणताही रस्ता होणार नाही.त्याला आमचा सर्वांचा विरोधच राहील असे दमयंतीराजे भोसले यांनी सांगितले.
हटविली जाणारी सर्व झाडे ही देशी प्रकारातली आहेत. या झाडांवर प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. झाडे हटविल्यास त्याचा मोठा परिणाम वातावरणाच्या बदलावर होईल. परिसरातील पाण्याची भूजल पातळी घटेल. शेती उत्पादनावर परिणाम होईल .रस्ता रुंदीकरणामुळे आजूबाजूची शेती आणि छोटे छोटे व्यवसाय अडचणीत येतील. ज्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. तो रस्ता महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळावर जातो आणि याच रस्त्यावर मोठा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे झाडांचे संवर्धन करूनच रस्त्याचे काम करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला. या फेरीत नीरज हातेकर,चित्रपट दिग्दर्शक अमीन हाजी, लेखिका ऐश्वर्या रेवडकर व राजेंद्र खरात, भाऊ मेहता,प्रशांत डोंगरे,नागेश मोने,कल्याण पिसाळ शहरातील सर्व संस्था, सर्व स्तरातील लोक तरुण लहान मुले ज्येष्ठ नागरिक महिला सहभागी झाल्या होत्या.








