मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्यावतीने लाठीमेळ्यासह पालखी मिरवणूक
खानापूर : शहरासह तालुक्यात पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ज्ञानेश्वर मंदिरात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने दुपारी 12.30 वाजता शिवजन्मसोहळा साजरा करण्यात आला. तसेच लक्ष्मी मंदिर, रवळनाथ मंदिर, चव्हाटा मंदिर, देसाई गल्ली या ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्यावतीने युवा समाजसेवक राजेंद्र चित्रगार, लायन्स क्लबचे अध्यक्ष रविसागर उप्पीन यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. ज्ञानेश्वर मूर्तीचे पूजन प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन राजेंद्र चित्रगार तर बसवेश्वर प्रतिमेचे पूजन रविसागर उप्पीन यांनी केले. यानंतर शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. सुवासिनीनी शिवजन्म साजरा करून पाळणागीत म्हटले. त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सागर पाटील, उमाकांत वाघधरे, संतोष परमेकर, दीपक परमेकर, रुपेश हडलगेकर, मनोज रेवणकर, रुपेश हडलगेकर, राजू परमेकर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्यावतीने शिवस्मारक येथे पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
निंगापूर गल्ली चव्हाटा शिवजयंती मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष
निंगापूर गल्ली येथे चव्हाटा शिवजयंती मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने शिवमूर्तीची स्थापना माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. रवळनाथ शिवजयंती मंडळाच्यावतीने सायंकाळी चित्ररथाचे पूजन करून शिवस्मारक येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. राजा छत्रपती स्मारकात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची पालखी आल्यानंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर हलगी पथक, झांजपथक व लाठीमेळा यांनी आपली प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शहरातील पारंपरिक मार्गावरुन पालखी फिरविण्यात आली. रात्री उत्सवाची सांगता करण्यात आली.









