पोहताना प्रदीपला पाण्याचा अंदाज आला नाही, तो खोल पात्रात गेला.
सातारा : वीर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी 27 रोजी सायंकाळी घडली. प्रदीप तात्याण्णा के. पी. (वय 29, रा. मुंबई, मूळ रा. हिरेहल्ली, ता. चित्तुर, कर्नाटक) असे त्याचे नाव असून तो शिरवळ येथील मुलांसोबत पोहण्यासाठी गेला होता. याची नोंद शिरवळ पोलिसात झाली आहे.
शिरवळ परिसरातील एका महाविद्यालयातील काही मुले कडक उन्हामुळे वीर धरण पात्रात पोहण्यासाठी रविवारी गेली होती. त्यांच्यासोबत मुंबईहून आलेला मित्र प्रदीपही गेला होता. पोहताना प्रदीपला पाण्याचा अंदाज आला नाही. तो खोल पात्रात गेला. ही बाब त्याच्या मित्रांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केला. तोपर्यंत गटांगळ्या खात प्रदीप बुडाला.
ही बाब मित्रांनी पोलिसांना आणि स्थानिकांना कळवली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह रात्री बाहेर काढला. याची खबर प्रदीपचा मित्र रत्नाकर शिवानंद हिरेमठ (रा. सोलापूर) याने शिरवळ पोलिसांना दिली. तपास हवालदार धुमाळ करत आहेत. रविवारी अमावस्या होती. जेथे प्रदीप बुडाला, तेथे यापूर्वी काही जण अमावस्येच्या दिवशी बुडाल्याच्या घटना घडल्या असल्याची चर्चा शिरवळ परिसरात सुरू होती.








