गुप्तचर विभागाने इशारा देऊनही दुर्लक्ष : पोलीस अधिकाऱ्यांतील बेबनावामुळे नामुष्की : भर कार्यक्रमात काँग्रेसवर अवमानास्पद प्रसंग
बेळगाव : केंद्र सरकारच्या दरवाढीविरोधात आणि संविधान बचाव आंदोलनासाठी सोमवारी सीपीएड मैदानावर काँग्रेसचा मेळावा झाला. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात भाजपच्यावतीने काळे ध्वज दाखविण्यात येणार आहेत, अशी स्पष्ट माहिती गुप्तचर विभागाने बेळगाव पोलिसांना देऊनही परिस्थिती हाताळण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी काळे ध्वज दाखविणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी भाजप महिला कार्यकर्त्यांनी ‘गो बॅक पाकिस्तान’ अशी घोषणा देत काळे ध्वज दाखवले. याचवेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारला. या दोन्ही घटनांचे पडसाद उमटले आहेत. भाजप नेते आक्रमक बनले आहेत. महिला कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोपही भाजपने केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कॅम्प पोलीस स्थानकात सहा महिला कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिल्पा केकरे, पवित्रा हिरेमठ, सुमित्रा जालगार, रेश्मा भरमाचे, अन्नपूर्णा हावळ, मंजुळा हन्नीकेरी यांना अटक केली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने या सर्व सहा जणींना जामीन मंजूर केला आहे. कॅम्प पोलीस स्थानकासमोर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी हटाव, देश बचाव’च्या घोषणा दिल्या. तर भाजप कार्यकर्त्यांनी ‘मुख्यमंत्री पाकिस्तानच्या एजंटासारखे वागत आहेत’ असा आरोप करीत पुन्हा ‘गो बॅक टू पाकिस्तान’च्या घोषणा देण्यात आल्या. या घटनांवरून सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग दीर्घ रजेवर आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचा बंदोबस्त करण्यात आला होता. गुप्तचर विभागाने भाजपकडून काळे ध्वज दाखविण्याची शक्यता वर्तवूनही बेळगाव पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही, असेच सोमवारच्या घटनेवरून दिसून येते. मेळाव्याच्या ठिकाणी सुरक्षेसाठी डोरफ्रेम मेटल डिटेक्टर लावण्यात आला होता. मात्र, मेळाव्याला जाणारे कार्यकर्ते या डिटेक्टरमधून जात नव्हते. बाजूने जात होते. पोलीस दलाला कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
पोलीस दलाचे गांभीर्यच हरवले
स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, एआयसीसीचे रणदीपसिंग सूरजेवाला यांच्यासह बहुतेक मंत्रिमंडळ बेळगावात असताना पोलीस दलाला त्याचे गांभीर्य नव्हते. त्यामुळेच असे प्रसंग घडल्याची चर्चा सुरू झाली असून गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात वाढलेल्या बेबनावामुळे कोणाचा पायपोस कोणास नाही, अशी स्थिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गटबाजी वाढली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पकड पूर्णपणे ढिली झाली आहे. मटका, जुगार, अमलीपदार्थ, बेकायदा दारूविक्री वाढली आहे. केवळ गैरधंदेचालकांकडून खिशे गरम करण्यापुरते काही अधिकारी कर्तव्य बजावत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांतील बेबनावामुळे भर कार्यक्रमात काँग्रेसला अवमानास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागले. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर याही पोलीस अधिकाऱ्यांवर भडकल्या. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वीच पोलीस अधिकाऱ्यांना कार्यक्षम बनण्याचा सूक्ष्म इशारा दिला होता. आता सरकारला खरोखरच बेळगावच्या परिस्थितीत सुधारणा करायची असेल तर पोलीस दलाला मेजर सर्जरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.









