वाढत्या उन्हामुळे शेतकरी हैराण : सकाळ-सायंकाळी पसंती
बेळगाव : वाढत्या उष्म्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे शेती कामाला सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतच पसंती दिली जात आहे. पारा 38 अंशाच्या पुढे गेल्याने शिवारही तापू लागले आहे. त्यामुळे दुपारच्या रखरखत्या उन्हात काम करणे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागले आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाने शेतकऱ्यांनी कामाच्या वेळेत बदल केला आहे. रब्बी हंगामात रताळी, बटाटे, भुईमूग, मका, ज्वारी यासह भाजीपाल्याची पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जावे लागते. मात्र सध्या वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळेत काम करणे कठीण होत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे. वाढत्या उन्हाने शेतकऱ्यांनीही आपल्या कामाच्या वेळेत बदल केला आहे. सकाळी आणि सायंकाळी शेतीकामाला पसंती दिली जात आहे.
कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट
वाढत्या उष्म्यामुळे नदी, तलाव, कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. त्यामुळे शेती पिकांना पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. वाढत्या उन्हात सकाळी आणि सायंकाळी शेतीकाम केले जात असले तरी दुपारच्या वेळेत विद्युत पुरवठा केले जात असल्याने काही शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रखरखत्या उन्हात पिकांना पाणी द्यावे लागत आहे. काही ठिकाणी सकाळच्या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्याने शेती पिकांना पाणी देणे सोयीस्कर होत आहे.
योग्य भाव मिळत नसल्याने भाजीपाला शिवारात पडून
शेती शिवारातील जलस्रोतांची पाणी पातळी घटल्याने पिके कोमोजू लगाली आहेत. तर काही ठिकाणी योग्य भाव मिळत नसल्याने भाजीपाला शिवारात पडून असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी वळिवाचा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याठिकाणी मशागतीच्या कामांनाही प्रारंभ झाला आहे. मात्र ही कामेही सकाळ, सायंकाळ किंवा रात्रीच्यावेळी ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी कामाच्या वेळेत बदल केला आहे.
दुपारच्या वेळेत शेतीकडे जाणे टाळा
तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत शेतीकामे करावीत. दुपारच्या वेळेत शेतीकडे जाणे टाळावे. वळीव पाऊस दमदार झाल्यानंतर खरीप हंगामातील मशागतीच्या कामांना जोर येणार आहे.
– एम. एस. पटगुंदी (साहाय्यक निर्देशक कृषी खाते)









